Porsche Car Accident Case: जामीनावर सुटले; व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला अन् आता पुन्हा अडचणी वाढल्या, पोर्शे प्रकरणातील विशाल अग्रवालचा जामीन रद्द करण्यासाठी पुणे पोलिस कोर्टात जाणार!


पुणे:  पुणे शहरातील अत्यंत बहुचर्चित आणि देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील, बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आता थेट अग्रवाल यांचा जामीन रद्द करण्यासाठी कायदेशीर पावले उचलत आहेत. यासंदर्भात २३ जून रोजी सत्र न्यायालयात (Sessions Court) रिट याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Porsche Car Accident Case: जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा पोलिसांचा दावा

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना जामीन मंजूर करताना काही कडक अटी घातल्या होत्या. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही आयटी इंजिनिअर तरुणांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे मानसिक अथवा शारीरिक त्रास होईल, असे कृत्य करू नये, अशी त्यात एक महत्त्वाची अट होती.

मात्र, जामीन मिळताच सोशल मीडियावर विशाल अग्रवाल यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अग्रवाल एका रूममध्ये आनंदोत्सव साजरा करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, हा व्हिडिओ खुद्द विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर (WhatsApp Status) ठेवला होता. हा स्टेटस पाहिल्याचा दावा करणाऱ्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतले असून, या जबाबांच्या आधारे कोर्टात जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा जोरदार युक्तिवाद केला जाणार आहे.

Porsche Car Accident Case: ‘व्हिडिओमुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या’

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ जुना असला तरी जामीन मिळाल्यानंतर तो अशा प्रकारे व्हॉट्सॲप स्टेटसवर प्रसिद्ध करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या अपघातात दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यांचे कुटुंबीय अद्यापही या भीषण धक्क्यातून सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत जामिनानंतर आनंदोत्सवाचा संदेश देणारा कोणताही व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणे म्हणजेच मृतांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असून, ते जामिनाच्या अटींच्या विरोधात आहे, असा दावा पोलिस न्यायालयात करणार आहेत.

याच भक्कम आधारावर पुणे पोलिस विशाल अग्रवाल यांचा जामीन तात्काळ रद्द करण्याची मागणी करणार आहेत. २३ जून रोजी दाखल होणाऱ्या या रिट याचिकेसोबत तो व्हायरल व्हिडिओ, साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब आणि अन्य तांत्रिक पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत.

Porsche Car Accident Case: “व्हिडिओ २०२३ मधील”; अग्रवाल यांच्या बाजूचा दावा

दुसरीकडे, विशाल अग्रवाल यांच्या वतीने हा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला संबंधित व्हिडिओ हा एप्रिल २०२३ मधील म्हणजेच अपघाताच्या आधीचा जुना व्हिडिओ असल्याचा दावा त्यांच्या वकिलांकडून केला जात आहे. तसेच जामीन मंजूर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला नसून, या कृत्याशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण अग्रवाल यांच्या बाजूने देण्यात आले आहे.

परंतु, पोलिसांनी अग्रवाल यांचा हा बचावाचा पवित्रा धुडकावून लावला असून, व्हिडिओ कधीचाही असला तरी तो आत्ता स्टेटसवर ठेवल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना तीव्र मानसिक त्रास झाला आहे, या मुद्द्यावर पोलिस ठाम आहेत. त्यामुळे आता २३ जून रोजी कोर्टात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *