Dharashiv : ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) लागलेली मोठी गळती आता उघड झाली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षाचा व्हीप (Whip) धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. अशातच आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. दोन्ही शिवसेनेच्या वतीनं हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच कोणत्या शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या, हे अद्याप खासदार ओमराजे निंबाळक यांचे ठरलं नाही. त्यामुळं शिवसेना वर्धापन दिनाला कोणत्याही मंचावर खासदार ओमराजे निंबाळकर हजेरी लावणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
सोशल मिडियावरुनही वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणं टाळलं
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही मंचावर खासदार ओमराजे निंबाळकर जाणार नाहीत. कोणत्या शिवसेनेला शुभेच्छा द्याव्या यामुळं सोशल मिडियावरुनही वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणं त्यांनी टाळलं आहे. समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या ओमराजेंनी पहिल्यांदाच शुभेच्छा देणं टाळलं आहे.
आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवे होते
मुलाखतीदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. ओमराजे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पक्षांतराच्या निर्णयावर बोलताना ओमराजे भावूक म्हणाले की, “मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिक दृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर निर्णय चुकीचा वाटतो. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केला तर बरोबर आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते
बंडखोरीमागचे कारण स्पष्ट करताना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, “आम्ही खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले. तर मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नाहीत, असे देखील ओमराजे निंबाळकर म्हणाले.
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं