16 चेंडूंत पन्नास, 34 चेंडूंत शतक! वैभव सूर्यवंशीनंतर बिहारच्या 19 वर्षीय लेकीचा धमाका; 126 चेंडूंत ठोकल्या 306 धावा, सगळेच अवाक, कोण आहे ती?


Bihar player Akshara Gupta Smashes 306 Runs Off 126 Balls : बिहार क्रिकेटमधून सध्या एकामागून एक अद्भूत हिरे देशासमोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता बिहारच्याच एका 19 वर्षीय महिला खेळाडूने क्रिकेट जगताला थक्क केले आहे. अक्षरा गुप्ता हिने अंडर-19 क्रिकेटमध्ये थेट त्रिशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-19 वन-डे ट्रॉफीमध्ये अक्षराने फक्त 126 चेंडूंमध्ये 306 धावांची ऐतिहासिक आणि अविस्मरणीय खेळी खेळली.

55 चौकार आणि 8 षटकारांचा पाऊस….

18 जून रोजी भागलपूरच्या सँडिस कम्पाउंड स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अक्षराने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. टीम-ए कडून सलामीला आलेल्या अक्षराने अवघ्या 16 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर केवळ 34 चेंडूंत तिने शतक झळकावून आपले इरादे स्पष्ट केले. शतक पूर्ण झाल्यावरही तिचा वेग कमी झाला नाही. तिने मैदानाभोवती चौफेर फटकेबाजी करत 126 चेंडूंत 306 धावा ठोकल्या. या वादळी खेळीत तिने 55 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

टीम-ए चा 450 धावांचा डोंगर आणि एकतर्फी विजय

अक्षराच्या त्रिशतकाव्यतिरिक्त सलोनी कुमारीने 57 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या जोरावर टीम-ए ने निर्धारित षटकांत 450 धावांचा महाकाय धावसंख्या उभारली. 451 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना टीम-सी चा डाव पूर्णपणे पत्त्यासारखा कोसळला. संपूर्ण संघ 21.3 षटकांत अवघ्या 121 धावांवर आटोपला. परिणामी, अक्षराच्या टीम-ए ने हा सामना 329 धावांच्या अवाढव्य फरकाने जिंकला.

भावाकडून मिळाली प्रेरणा

सामन्यानंतर अक्षराने सांगितले की, तिला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा तिच्या भावाकडून मिळाली. भावाला खेळताना पाहून तिची क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तिने हे करिअर निवडले. अक्षरा गेल्या दोन वर्षांपासून बिहार राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.  

भविष्यातील स्मृती मानधना

अक्षरा गुप्ताची ही खेळी पाहून क्रिकेट तज्ज्ञ तिच्यात भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य पाहत आहेत. तिची ही कामगिरी अशीच सुरू राहिली, तर आगामी काळात ती स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय संघात स्थान मिळवू शकते.

हे ही वाचा –

FIFA World Cup 2026 : वर्ल्ड कपमध्ये हादरवणारी घटना! एका फुटबॉलपटूचा पाय मोडला; मैदानावर राडा, कोचसह दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना मारायला धावले





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *