24 वर्षीय तरुणाचं 30 वर्षीय महिलेवर प्रेम, गरोदर राहिली, दुसरी गर्लफेंड मिळताच पहिलीची हत्या, फावड्याने डोकं केलं चेंदामेंदा | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

प्रेमाच्या त्रिकोणातून एका ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं दुसरी गर्लफ्रेंड मिळताच थंड डोक्याने पहिलीची हत्या केली आहे.

News18
News18

प्रेमाच्या त्रिकोणातून एका ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या आणि अन्य एका साथीदाराच्या मदतीने महिलेची गळा दाबून हत्या केली. यानंतर आरोपींनी महिलेची ओळख पटू नये म्हणून फावड्याने तिचं डोकं चेंदामेंदा केलं. तसेच एका शेतात मृतदेह टाकून पळ काढला. मात्र एका अर्धवट फाटलेल्या रेल्वेच्या तिकीटावरून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

ही घटना मध्य प्रदेशातील मेहगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पिपरोली गावाजवळ घडली. येथील एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आरोपींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी फावड्याने चेहऱ्यावर वार करून मृतदेह छिन्नविछिन्न केला होता.

लव्ह ट्रँगलमधून हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी पिपरोली गावाजवळील बंबे येथे एका अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. तपासादरम्यान तिची ओळख इंद्रवती (वय ३० वर्ष, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) अशी पटली.

तपासात समोर आले की, मुख्य आरोपी २४ वर्षीय नारायण बघेल (रा. अजनोल, मेहगाव) हा गुजरातच्या सुरत शहरात काम करत होता. तिथेच त्याची ओळख इंद्रवतीशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान इंद्रवती ६ महिन्यांची गरोदर राहिली. तिने नारायणकडे लग्नासाठी तगादा लावायला सुरुवात केली, मात्र तो लग्न टाळत होता. याच काळात नारायणचे भिंड येथील संगीता बघेल नावाच्या दुसऱ्या तरुणीसोबतही प्रेमसंबंध सुरू झाले. जेव्हा इंद्रवतीला संगीताबाबत कळालं, तेव्हा तिने नारायणला कायदेशीर कारवाईची धमकी दिली. यानंतर संगीताच्या सांगण्यावरून नारायणने इंद्रवतीला वाटेतून हटवण्याचा कट रचला.

लग्नाचे आमिष दाखवून बोलावले अन् शेतात संपवले

नारायणने इंद्रवतीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून मेहगाव येथे बोलावलं. इंद्रवती मथुरावरून ग्वाल्हेरला ट्रेनने पोहोचली आणि तिथून मेहगावला आली. आरोपी नारायण त्याचा साथीदार कुंदन उर्फ आयुष बाथम याच्यासह तिला पिपरोली येथील शेतात घेऊन गेला. तिथे नारायण, संगीता आणि कुंदन या तिघांनी मिळून आधी तिचा गळा दाबला. त्यानंतर तिची ओळख लपवण्यासाठी फावड्याने चेहऱ्यावर गंभीर वार करून तिची हत्या केली.

फाटलेले रेल्वे तिकीट ठरलं तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा

या प्रकरणाचा छडा लावण्यात घटनास्थळी मिळालेले एक फाटलेले रेल्वे तिकीट सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरले. हे तिकीट मथुरा ते ग्वाल्हेर प्रवासाचे होते. या सुगावाच्या आधारे सायबर टीमने रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये मृत महिला दोन संशयित व्यक्तींसोबत जाताना दिसली. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी नारायण, संगीता आणि कुंदन यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कसून चौकशीत तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला.

मराठी बातम्या/देश/

24 वर्षीय तरुणाचं 30 वर्षीय महिलेवर प्रेम, गरोदर राहिली, दुसरी गर्लफेंड मिळताच पहिलीची हत्या, फावड्याने डोकं केलं चेंदामेंदा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *