संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच… माजी आमदाराचे वादग्रस्त विधान – Marathi News | Asif sheikh controversial statement on chhatrapati sambhajinagar name change row


राज्य सरकारने 3 वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून संभाजीनगर हे नाव वापरले जात आहे. अशातच आता या नामांतरावर एका माजी आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. नाशिकच्या मालेगावमधील इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी संभाजीनगर हे नाव लादलं आहे, आमच्या मनात तर औरंगाबादच आहे असं विधान केलं आहे. शेख यांच्या या विधानावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

आमच्या मनात आजही औरंगाबाद…

इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर या नामकरणावर बोलताना म्हटले की, ‘औरंगाबाद वसलेलं आहे, ते इथून कुठे जाणार नाही. सरकारने बहुमताच्या आधारे नाव बदललं. या शहरातील लोकांच्या भावनांची कदर न करता बदल झाला. सरकारने नाव बदलण्याबाबत जनतेचं मत विचारात घ्यायला पाहिजे होतं, त्यावर सुनावणी घ्यायला हवी होती. जनमत घ्यायला हवं होतं, हे सगळं न करता छत्रपती संभाजीनगर हे नाव लादण्याचं काम केलं. मात्र आमच्या मनात आजही औरंगाबाद हेच नाव आहे.’

बहुत कुच मिटाना बाकी है – केणेकर

आसिफ शेख यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी म्हटलं की, ‘आसिफ शेख यांना माहित नाही की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, ज्यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेला आहे. ही तर झांकी आहे बहुत कुच मिटाना बाकी है. यांचे सगळे मनसुबे मातील गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यांनी हे लक्षात ठेवावं. ‘

कोण आहेत आसिफ शेख?

आसिफ शेख रशीद हे मालेगाव येथील एक प्रमुख नेते असून ते इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आसिफ शेख हे 2014 ते 2019 या काळात मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पक्षाचे पूर्ण नाव ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र’ असे आहे. त्याच्या इंग्रजी अद्याक्षरांवरून संक्षिप्त नाव ‘ISLAM’ (इस्लाम) असे तयार झाले आहे. आसिफ शेख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडल्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. अलिकडील मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाने चमकदार कामगिरी केली होती. सध्या मालेगावमध्ये हा पक्ष सत्तेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *