सातारा : आपल्या धडाडीच्या कारवाईने पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आपलं काम दाखवून दिलंय. कालच तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभरात त्यांच्या विभागाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच, यापुढे गुटखा, तंबाखूनजन्य पदार्थांच्या उत्पादकांपासून ते विक्रेते आणि ग्राहकांवरही मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे, पुन्हा एकदा गुटखा विक्रेते आणि मेडिकल क्षेत्रातील काळे धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत. त्यावर, आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना तुकाराम मुंढेंकडून सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, या कारवाईंचं स्वागत करत तुकाराम मुंढेंचंही त्यांनी कौतुक केलंय. तुकाराम मुंढे धडक कारवाई करत असतील तर चांगली गोष्ट आहे. अन्न आहे, दूध आहे, खायचे पदार्थ आहेत, या सगळ्यात भेसळ सर्रास होते हे सगळ्यांना माहिती आहे. मी स्वत: फोन करुन त्यांना सांगितलं की, दुधामध्ये भेसळ होतेय, कसले कसले केमिकल त्यात टाकले जातात. त्यामुळे, किडन्यांचे रोग वाढतात, म्हणून लोकांचं भविष्यच उध्वस्त होतं. तुम्ही यावर जास्त जोर द्या, जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा, असे सांगितल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
अन्न धान्य, औषधे यांमध्ये भेसळ करणाऱ्यांना मकोका लावायचा असेल तर लावलाच पाहिजे. कारण, तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही खोट्या औषधांतून लोकांचे जीव घेता, म्हणून अवश्य कारवाई करा, असेही सांगितल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
ठराविक मेडिकलमधून औषध घेण्याची सक्ती नको – मुंढे
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह, हॉटेल व्यवासायिकांसह, दूध भेसळांवरील कारवाईचा धडाका लावल्यानंतर मेडिकल दुकानदारांनाही इशारा दिला आहे. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठा दणका दिला आहे. “रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधे कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा अधिकार आहे,” असा महत्त्वपूर्ण आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
हेही वाचा
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!