Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल


Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेवर नुकत्याच निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी काका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. दोघांनी स्वतःला त्यांच्या (नीला विखे पाटील)  राजकीय यशाचा एक भाग म्हणून दाखवण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. नीला या राधाकृष्ण यांचे मोठे भाऊ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.

काकांशी किंवा चुलत भावाशी कोणताही संपर्क नाही

नीला यांनी स्टॉकहोममधून ‘पीटीआय’शी बोलताना सुजय विखे यांच्यावर कडाडून प्रहार केला. त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, एका व्यक्तीने मला एक व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये सुजय अशी बढाई मारताना दिसत आहेत की, विखे कुटुंबाने हे सुनिश्चित केलं की जरी महाराष्ट्रात त्यांचा खासदार (स्वतः सुजय) पराभूत झाला असला, तरी कुटुंबातीलच आणखी एक सदस्य स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आली. नीला विखे यांनी हे आश्चर्यकारक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, गेल्या एका दशकात माझा माझ्या काकांशी किंवा चुलत भावाशी कोणताही संपर्क आलेला नाही. मी नियमितपणे भारतात येत असते. आता, खासदार म्हणून माझी निवड झाल्यानंतर, त्यांना माझ्या यशाचा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

त्यांनी मात्र पक्ष बदलले आहेत

सुजय विखे पाटील यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर मतदारसंघातून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांच्याकडून पराभव झाला होता. “त्यांचे राजकारण माझ्यापेक्षा वेगळे आहे. मी माझा पक्ष कधीच बदलणार नाही. त्यांनी मात्र पक्ष बदलले आहेत,” असे 41 वर्षीय नीला म्हणाल्या. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्या 349 सदस्यांच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी काकांनी मला फोन केला, ही चांगली गोष्ट होती. पण तेवढेच. गेल्या दशकात त्यांच्याशी किंवा माझ्या चुलत भावाशी कोणताही संपर्क झालेला नाही,” असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी निला यांच्या यशावर कुटुंबासाठी ‘अभिमान आणि आनंदाची’ बाब असल्याचे म्हटले होते. “तिला मिळालेले हे यश म्हणजे तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचीच पावती आहे,” असे त्यांनी सांगितले होते.

कोण आहेत नीला विखे पाटील?

नीला विखे पाटील या स्वीडनमधील ‘ग्रीन पार्टी’च्या (पर्यावरणवादी पक्ष) प्रमुख सदस्य आहेत. दुसरीकडे, 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेत होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी  कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते. स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला यांनी ‘गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस’ आणि ‘युनिव्हर्सिटी द कॉम्प्ल्युटेन्स’मधून अर्थशास्त्र व कायद्यातील एमबीए (MBA) पूर्ण केले; त्यानंतर त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केले.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *