Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जन दरम्यान ‘या’ चुका चुकूनही करू नये! भक्ती, परंपरा अन् पर्यावरणाची जबाबदारी, काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व..


Ganesh Visarjan 2026: आज अनंत चतुर्दशी… गणेशोत्सवाची सांगता आज गणेश विसर्जनाने होत आहे. बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये उत्साहासोबतच सर्वत्र भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, बाप्पाच्या विसर्जनाचा धार्मिक विधी श्रद्धा आणि शिस्तीने पार पाडणे महत्त्वाचे मानले जाते. बाप्पाच्या विसर्जन दरम्यान कोणत्या चुका करू नये? जाणून घ्या…

बाप्पाच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी – 6:28 ते 10:59 शुभ चौघडिया
दुपारी – 12:30 ते 2:01 पर्यंत शुभ चौघडिया
सायंकाळी – 5:02 ते 6:32 पर्यंत शुभ चौघडिया.
रात्री – 9:31 ते 11:01 पर्यंत शुभ चौघडिया..

गणेश विसर्जन दरम्यान ‘या’ चुका चुकूनही करू नये! (Ganesh Visarjan 2026)

विसर्जनापूर्वी गणपतीची उत्तरपूजा अपूर्ण ठेवू नये, अशी धार्मिक परंपरा आहे. पूजा आणि आरती झाल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना केली जाते. त्यानंतर गणेशमूर्ती आदरपूर्वक विसर्जनासाठी नेली जाते. मूर्तीची हाताळणी करताना घाई किंवा निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला दिला जातो.

विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदी, तलाव किंवा समुद्रात टाकू नये. फुले, हार, दुर्वा आणि इतर पूजेचे साहित्य वेगळे जमा करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार त्याची विल्हेवाट लावावी. पर्यावरणाचा विचार करून प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करण्याचे आवाहनही केले जाते.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान धार्मिक वातावरणाचा आदर राखणे, गर्दीत शिस्त पाळणे आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. बाप्पाला निरोप देताना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत भक्तिभाव कायम ठेवला जातो.

गणेश विसर्जनाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धार्मिक परंपरेत गणेश विसर्जनाला विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पांचे आगमन हे मंगलता, सुख-समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. काही दिवसांच्या पूजेनंतर विसर्जनाच्या माध्यमातून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याची परंपरा आहे. “पुढच्या वर्षी लवकर या” या भावनेतून गणरायाचे पुन्हा स्वागत करण्याची भक्तांची इच्छा व्यक्त होते. म्हणूनच गणेश विसर्जन हा केवळ उत्सवाचा शेवट नसून श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि पर्यावरणाची जबाबदारी जपण्याचा प्रसंग म्हणून साजरा करणे महत्त्वाचे आहे.

विसर्जनापूर्वी भगवान गणेशाची पूजा पद्धत

स्नान, स्वच्छता – पूजा करण्यापूर्वी घरातील सर्वांनी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजेची जागा स्वच्छ करावी.

गणपतीसमोर दिवा लावावा – अगरबत्ती/धूप लावून बाप्पांना नमस्कार करावा.

संकल्प आणि प्रार्थना – मनात बाप्पांना नमस्कार करून, “हे गणराया, आमच्याकडून झालेल्या पूजा-अर्चेतील चुका क्षमा कराव्यात आणि आपल्या कृपेने आमच्या परिवारावर सुख-समृद्धी राहू द्यावी,” अशी प्रार्थना करावी.

बाप्पांना नैवेद्य दाखवावा – मोदक, फळे, पेढे किंवा घरचा आवडीचा नैवेद्य अर्पण करावा.

फुले, दुर्वा आणि अक्षता अर्पण कराव्यात – गणपतीला फुले आणि दुर्वा वाहून अक्षता अर्पण कराव्यात.

आरती करावी – कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे गणपतीची आरती करावी.

उत्तरपूजा करावी – गणपतीला नमस्कार करून, पूजा स्वीकारल्याबद्दल आणि आपल्या घरी येऊन आनंद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. “गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या,” अशी प्रार्थना करावी.

विसर्जनासाठी बाप्पांना निरोप – बाप्पाची मूर्ती अलगद उचलून फुलांनी सजवलेल्या ताटात/पाटावर ठेवावी. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने औक्षण करून बाप्पांना निरोप देऊ शकतो.

जयघोष करत विसर्जनस्थळी जावे – “गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!”

हेही वाचा :

Hindu Religion: सूर्यास्तानंतर घरातील केर का काढला जात नाही? सायंकाळी केर काढावा लागला तर? गरुडपुराणातील रहस्य, धार्मिक मान्यता कमी लोकांना माहित…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *