Ayushmann Khurrana On Pakistan Zindabad Chant: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुराना (Actor Ayushmann Khurrana) याचा आगामी सिनेमा ‘उडता तीर’ (Udta Teer)चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमात तो एका पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देताना दिसतोय. या सीनबाबत आयुष्माननं स्पष्टीकरण दिलंय. तो ‘बेलाल अहमद’ नावाच्या पाकिस्तानी हेराची भूमिका साकारतोय, ज्याची स्मृती गेल्यामुळे त्याला आपण भारतीय आहोत असं वाटू लागतं. त्याची देशभक्तीची भावना कायम असली तरी, आपण नक्की कोणत्या देशाचे आहोत, हे त्याला आठवत नाही, सिनेमातील विनोदाचा मुख्य आधार हाच गोंधळ आहे.
आयुष्मान खुराना काय म्हणाला? (Ayushmann Khurrana On Udta Teer Movie)
ट्रेलर लाँचच्या वेळी, आयुष्मानला विचारण्यात आलं की, पाकिस्तानी एजंटची भूमिका साकारताना “पाकिस्तान जिंदाबाद” म्हणणं त्याला जड नाही गेलं का? त्यावर त्यानं स्पष्टपणे सांगितलं की, “हे स्क्रिप्टचा भाग आहे. एक अभिनेता म्हणून, स्क्रिप्टची जी मागणी असते, त्यानुसारच मी काम करतो. प्रत्येक स्पाय मुव्हीमध्ये असं घडलंय. इथे फरक एवढाच आहे की, हा एक ‘स्पाय-कॉमेडी’ सिनेमा आहे, एक देशभक्तीपर विनोदी चित्रपट, आणि हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. मी नेहमीच पटकथेला प्राधान्य देतो, स्क्रिप्टमध्ये जसं सांगितलंय, तसंच मी करतो. मी दिग्दर्शकाच्या सांगण्यांनुसार, काम करणारा अभिनेता आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट स्क्रिप्ट लिहिलीय…”
सारा अली खानसोबत केलंय काम (Sara Ali Khan Udta Teer Movie)
आगामी सिनेमात आयुष्मान खुराना यानं सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर केलीय. सारा अली खाननं आपल्या केमिस्ट्रीबाबत बोलताना सांगितलं की, त्यांनी ‘उड़ता तीर’ सिनेमाची शुटिंग आधीच पूर्ण केलेली. त्यानंतर दोघांनी ‘पती पत्नी और वो 2’ (Pati Patni Aur Woh Do) मध्ये एकत्र काम केलं. ती म्हणाली, “मला यात खूप मजा आली. एकाच सह-कलाकारासोबत अशा प्रकारची वेगळी ‘केमिस्ट्री’निर्माण करणं एखाद्या कलाकारासाठी खूप रोमांचक असते. एका सिनेमात मी त्याच्या आयुष्यात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत असते, तर दुसऱ्या सिनेमात मी त्याची पत्नी असते. इतक्या कमी कालावधीत अशा भिन्न भूमिका आणि नातेसंबंध साकारणे खूप छान होते…”
‘उडता तीर’ सिनेमाबाबत थोडसं… (Ayushmann Khurrana, Sara Ali Khan Udta Teer Movie)
‘उडता तीर’ (Udta Teer) हा लेखक आकाश ए. कौशिक यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्याव्यतिरिक्त, या सिनेमात मुकुल देव, गुलशन ग्रोव्हर, राम कपूर, रघुबीर यादव, सुप्रिया पिळगावकर, स्मिता तांबे, बृजेंद्र काला आणि संदीप आनंद यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ आणि ‘सिख्या एंटरटेनमेंट’ यांच्या बॅनरखाली केली जात आहे. हा सिनेमा 9 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान सध्या ‘उडता तीर’ आणि ‘ये प्रेम मोल लिया’ (Yeh Prem Mol Liya) या दोन सिनेमांच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. हे दोन्ही सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.