Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


Uddhav Thackeray: मराठवाडा, महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत यासाठी आम्ही भाजपसोबत तेव्हा गेलो, नंतर कळाल्यानंतर आम्ही साथ सोडली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कर्जमुक्ती दिली, शिवभोजन थाळी सुरु केली. तुझं माझं करण्यापेक्षा आता तुम्ही काय करणार? आपत्ती आपल्या हातात नसते, आता तुम्ही काय करणार आहात? एल निनो भाकीत असताना तुम्ही तयारी का नाही केली? शेतकऱ्यांच्या घरातले दिवे विजत असताना, वंशाचे दिवे विझत असताना तुम्ही मोदींच्या वाढदिवसचे दिवे काय लावताय? दुष्काळ कधी जाहीर करणार आहात? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी प्रहार केला.

मराठवाड्यातील नेतृत्व संपवत असल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावरही सडकून प्रहार केला. त्यांनी मराठवाड्यातील नेतृत्व सरकार संपवत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात आम्ही पाणी कसं आणणार हे किती वेळेस सांगितलं? हे आज त्यांनी कितव्यादा सांगितलं? ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे, प्रमोद हाजन यांनी आमची ओळख भाजपशी करून दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यचं रहस्य उलघडलेलं नाही. मी संशय व्यक्त केलेला नाही, आरोप केलेला नाही, मला याची खंत आहे. महाराष्ट्राला न्याय देणारे नेते होते, ते आता नाहीत. संशय आहे, तर चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. 

मराठ्यांना पेटवून ठेवलंय

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप फक्त सत्तापिपासू आहे. काय वाटेल ते करतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. यांनी एकतर संपूर्ण देशामध्ये हिंदू-मुस्लिम म्हणून आग लावली, तरीदेखील आता बरेचसे मुसलमान शिवसेनेसोबत आले, कारण त्यांना खरं हिंदुत्व काय आहे हे त्यांना कळलं आहे, पण यांनी केवळ हिंदू-मुस्लिम करून नाही थांबले. महाराष्ट्रामध्ये आता जातीपातीमध्ये भिंती उभ्या केल्या आहेत. मराठ्यांना पेटवून ठेवलंय, त्यांच्याविरुद्ध ओबीसींना उभं केलंय, तिकडे धनगरांना उभं केलंय, इकडे कुणबी आहेत, तिकडे आदिवासी आहेत. जरांगे मुंबईला चालले होते. एक माणूस स्वतःचे प्राण पणाला लावून तिकडे लढतोय आणि दुसरा माणूस लंडनमध्ये जाऊन पुरस्कार घेतोय, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर तोफ डागली. 

आपल्याला लढवतायेत, कोपराला गूळ लावतायेत

त्यांनी सांगितले की, मी महाराष्ट्राला हात जोडून नव्हे, साष्टांग नमस्कार घालून विनंती करतोय, अगदी जरांगे पाटलांनासुद्धा, ओबीसीलासुद्धा, धनगर, आदिवासी, जे जे कोणी जातीपाती असतील, की कृपा करा हा सरकारचा डाव हाणून पाडा. हे आपल्याला लढवतायेत, कोपराला गूळ लावतायेत. निवडणुका आल्यानंतर सगळं तुमचं मान्य म्हणून गुलाल उधळतायेत. निवडणूक जिंकल्यानंतर विजयाचा गुलाल उधळतायेत आणि तुम्हाला तसंच ते सडवत ठेवतायेत, तुमच्या जिवाशी खेळतायेत.

ते पुढे म्हणाले, म्हणून मी सर्व तमाम जातीपातींना अगदी साष्टांग दंडवत घालून विनंती करतो, आपण सगळे एकत्र येऊया. महाराष्ट्राची लेकरं म्हणून एकत्र येऊया, एका मातीची एका मातीची लेकरं म्हणून एकत्र येऊया. एकजुटीने जर लढलो, तर  कोणाची माय व्यायलीये, कोण तुम्हाला न्याय देत नाही ते मी बघतो. कारण हीच जी नस त्यांनी पकडली आहे जी अब्दालीने पकडली होती, की हे सगळे मराठे हे जातीपातीत विखुरलेले आहेत, हे एकत्र येऊ शकत नाहीत. आणि तेच दुहीचं बीज हे पेरून हे स्वतः राज्य भोगतायेत आणि तुम्हाला असं सडवत ठेवलेलं आहे. किती काळ भोगणार तुम्ही हे सगळं? अशी विचारणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *