Manoj Patil selected for the Asian Games badminton contingent.
जपानमधील आयची-नागोया येथे २५ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी, ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (BAI) पथकात ‘गोवा बॅडमिंटन असोसिएशन’चे अध्यक्ष मनोज पाटील यांची निवड झाली आहे. गोव्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात त्यामुळे मानचा तुरा रोवला गेला असल्याचे म्हटले जात आहे.
गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे माजी क्रिकेटपटू असलेले मनोज पाटील हे ‘गोवा ऑलिम्पिक असोसिएशन’चे सह-सचिव आहेत. तसेच, ‘गोवा पिकलबॉल असोसिएशन’च्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते तिथे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान विविध खेळांमध्ये विस्तारले आहे. त्याचबरोबर क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वाने क्रीडा क्षेत्राचा फायदा झाला आहे.
मनोज पाटील हे सध्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव आहेत आणि ‘व्हायब्रंट गोवा फाऊंडेशन’चे संस्थापक विश्वस्त आहेत.या फाऊंडेशनने ऑक्टोबर २०१८ आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये गोव्यातील सर्वात मोठ्या ‘बिझनेस एक्स्पो’चे आयोजन केले होते.उद्योजकता आणि क्षमता-बांधणी कार्यक्रम राबवण्यासोबतच, रोटरी, जेसीज (Jaycees), बीएनआय (BNI) आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी समाजात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
कामगिरी अविस्मरणीयआणि यशस्वी ठरो – प्रवीण शेणॉय
‘गोवा बॅडमिंटन असोसिएशन’ने मनोज पाटील यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.”एक खेळाडू आणि प्रशासक म्हणून मनोज यांचा अनुभव, तसेच गोव्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहता, ही त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली आहे. ते या नव्या भूमिकेतून गोव्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांची ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी अविस्मरणीयआणि यशस्वी ठरो, अशा शुभेच्छा आम्ही त्यांना देत आहोत असे असोसिएशनचे सचिव प्रवीण शेणॉय यांनी म्हटले आहे.