Mamata Banerjee : सत्ता गेली अन् आता पक्षही जाणार? बंगालमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धास्ती; ममता बॅनर्जींचे टेन्शन वाढलं! Inside Story | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

Mamata Banerjee : विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस (TMC) समोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे.

News18
News18

कोलकाता: विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस (TMC) समोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासमोर आता पक्ष वाचवण्याचे आव्हान उभं राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. बंगालच्या राजकारणात महाराष्ट्र पॅटर्न सुरू होणार असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचाही पक्ष धोक्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

कोलकातामधील आमदार निवास भूकंपाचं केंद्र?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूलमधून हकालपट्टी झालेले आणि नाराज असलेले नेते गेल्या काही दिवसांपासून कोलकाता येथील ‘एमएलए हॉस्टेल’मध्ये सातत्याने गुप्त बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये तृणमूलचे भविष्य, पक्ष संघटनेतील बदल आणि एका नव्या राजकीय पर्यायाची चाचपणी केली जात असल्याचे समजते. या गुप्त हालचालींनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढवली आहे.

दोन आमदारांच्या हकालपट्टीनंतर ठिणगी

तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाने पक्षाविरोधी कारवायांचा आरोप ठेवत उलुबेरिया पूर्वचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि एंटालीचे आमदार संदीपन साहा यांची पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली. या कारवाईनंतर वादाची ठिणगी पडली आहे. या दोन्ही आमदारांनी विरोधी पक्षनेत्याशी संबंधित प्रस्ताव आणि स्वाक्षरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. संदीपन साहा यांनी आरोप केला होता की, बैठकीला अनुपस्थित असलेल्या काही लोकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या कागदपत्रांवर करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर पक्षांतर्गत धुसफूस आणखी चव्हाट्यावर आली आहे.

‘तृणमूल’ वर दावा करण्याची तयारी?

पक्षाचे निलंबित प्रवक्ते रिजू दत्ता हे सातत्याने पक्ष नेतृत्वावर टीका करत असून संघटनेत गंभीर त्रुटी असल्याचे आरोप करत आहेत. त्यातच काही नाराज नेते आता ‘तृणमूल’ या नावाशी साधर्म्य असलेला नवीन राजकीय मंच स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही गणिते जुळल्यास थेट पक्षावरही थेट दावा केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, जवळपास १५ ते २० आमदार या नाराज नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि ते पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा गट तयार करत आहेत.

बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?

बंगालमधील या घडामोडींची तुलना थेट २०२२ मधील महाराष्ट्राच्या राजकारणाशी केली जात आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून शिवसेना फोडली आणि नंतर खरी ‘शिवसेना’ म्हणून मान्यता मिळवली. तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून शरद पवारांना धक्का दिला. अगदी तशीच परिस्थिती सध्या बंगालमध्ये निर्माण झाली आहे. बंद दाराआड होणाऱ्या गुप्त बैठका आणि आमदारांची नाराजी हे त्याचेच संकेत मानले जात आहेत.

ममता बॅनर्जींनी मानला धोका…

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देखील हा धोका मान्य केला आहे. पक्ष कमकुवत करण्यासाठी आणि तोडण्यासाठी एक ‘संघटित कट’ रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सार्वजनिकरित्या केला. कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना ममता म्हणाल्या, “तृणमूलची खरी ताकद जमीनीवरचे कार्यकर्ते आहेत, काही नेते नव्हे. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही आणि अशा नेत्यांशिवायही पक्ष पुढे जाऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.

खरोखरच तृणमूल फुटणार?

राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्या तरी महाराष्ट्रासारखी उघड बंडाळी झालेली नाही. अद्याप कोणत्याही मोठ्या गटाने उघडपणे बंडाचे निशाण फडकवलेले नाही. पक्ष फुटण्यासाठी मोठ्या संख्येने आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. मात्र, ज्या वेगाने दोन आमदारांची हकालपट्टी झाली आणि ममता बॅनर्जींनी स्वतः पक्ष फुटण्याची भीती व्यक्त केली, त्यावरून तृणमूल नेतृत्व या धोक्याला अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट आहे. येत्या काळात नाराज आमदारांची संख्या वाढल्यास बंगालच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मराठी बातम्या/देश/

Mamata Banerjee : सत्ता गेली अन् आता पक्षही जाणार? बंगालमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धास्ती; ममता बॅनर्जींचे टेन्शन वाढलं! Inside Story



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *