शाहिद अफ्रिदीने आमिरच्या कानशिलात लगावलेली अन् पाकिस्तान क्रिकेट हादरलं! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा Scandal


28 ऑगस्ट 2010… क्रिकेटविश्वाला हादरवून सोडणाऱ्या पाकिस्तानच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा पर्दाफाश याच दिवशी झाला. लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानच्या तीन खेळाडूंनी जाणूनबुजून नो-बॉल टाकल्याचा आरोप समोर आला आणि क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. या प्रकरणात तत्कालीन पाकिस्तानचा कर्णधार सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांची नावे समोर आली. या प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेटची मोठी बदनामी झाली आणि तिन्ही खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कठोर कारवाई केली.

मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा अधिकृतपणे पर्दाफाश होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या काही खेळाडूंना संघातील काही क्रिकेटपटूंच्या कथित गैरप्रकाराची कुणकुण लागली होती. विशेष म्हणजे, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक यांनी या प्रकरणाबाबत केलेल्या दाव्यानुसार, ही माहिती एका खराब मोबाईल फोनमधील मेसेजमुळे समोर आली होती. त्यानंतर ही माहिती शाहिद अफ्रिदीपर्यंत पोहोचली आणि पुढे आमिरला बंद खोलीत बोलावून त्याची चौकशी करण्यात आली.

मोबाईल रिपेअर करताना सापडले फिक्सिंगचे मेसेज

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा धागा थेट एका मोबाईल फोनपर्यंत जाऊन पोहोचला होता. अब्दुल रज्जाक यांनी एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमात सांगितले होते की, त्यांच्या एका मित्राला मोबाईल रिपेअर करण्याचे काम होते. कथितरित्या सट्टेबाजीशी संबंधित एजंट मजहर मजीदचा खराब मोबाईल त्याच्याकडे दुरुस्तीसाठी आला होता. मोबाईल दुरुस्त केल्यानंतर त्यामध्ये असलेले काही मेसेज त्या मित्राच्या नजरेस पडले. या मेसेजमध्ये क्रिकेट सामन्यातील स्पॉट फिक्सिंगशी संबंधित चर्चा असल्याचा दावा करण्यात आला. मित्राने हे मेसेज अब्दुल रज्जाक यांना दाखवले. रज्जाक यांनी ही माहिती पाकिस्तानच्या त्यावेळच्या वरिष्ठ खेळाडूंना, त्यात शाहिद अफ्रिदीलाही, दिल्याचे सांगितले.

अफ्रिदीने आमिरला खोलीत बोलावलं अन्…

रज्जाक यांच्या दाव्यानुसार, माहिती मिळाल्यानंतर शाहिद अफ्रिदीने मोहम्मद आमिरला आपल्या खोलीत बोलावले. खोलीचा दरवाजा बंद करून त्याच्याकडे या प्रकरणाबाबत विचारणा करण्यात आली. आमिर सुरुवातीला काहीही मान्य करत नव्हता, असा दावा रज्जाक यांनी केला. मात्र त्यानंतर बंद खोलीतून कानाखाली मारल्याचा आवाज ऐकू आला. काही वेळाने आमिर रडत बाहेर आला आणि त्याने कथितरित्या स्पॉट फिक्सिंगच्या कटात आपला सहभाग असल्याचे मान्य केले, असे रज्जाक यांनी सांगितले होते. या दाव्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटविश्वात आणखी खळबळ उडाली होती. कारण अधिकृत स्टिंग ऑपरेशनमधून प्रकरण समोर येण्यापूर्वीच संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना याची माहिती मिळाल्याचे यामुळे समोर आले.

स्टिंग ऑपरेशनने जगासमोर आणलं सत्य

दरम्यान, ब्रिटिश वृत्तपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा एजंट मजहर मजीद कॅमेऱ्यात बोलताना दिसला. त्याने पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूंना सामन्यात ठराविक वेळी जाणूनबुजून नो-बॉल टाकण्यासाठी पैसे दिल्याचा दावा केला. या स्टिंगमध्ये एका फिक्सिंगसाठी सुमारे १.५ लाख पौंड रक्कम ठरल्याचा दावा करण्यात आला होता. लॉर्ड्स कसोटीत मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांनी ठरल्याप्रमाणे नो-बॉल टाकल्याचेही या प्रकरणातून समोर आले. मजहर मजीदने आणखी काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंची नावे घेतल्याचे वृत्त होते. यामध्ये सलमान बट आणि कामरान अकमल यांच्यासह इतर खेळाडूंचाही उल्लेख करण्यात आला होता. मात्र या प्रकरणातील सर्व आरोप समान पद्धतीने सिद्ध झाले नाहीत.

आमिर, आसिफ आणि बट यांच्यावर बंदी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आयसीसीने सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांच्यावर बंदी घातली. तिन्ही खेळाडूंना क्रिकेटपासून दूर राहावे लागले. याशिवाय ब्रिटनमधील न्यायालयीन कारवाईतही त्यांना शिक्षा झाली. विशेष म्हणजे, त्यावेळी मोहम्मद आमिर हा पाकिस्तान क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान युवा वेगवान गोलंदाज म्हणून पाहिला जात होता. त्यामुळे त्याच्यावर झालेली कारवाई पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक होती.

हे ही वाचा –

Team India Schedule : श्रीलंका दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?, सप्टेंबरमध्ये रोहित, विराट, वैभव सगळेच मैदानात दिसणार; जाणून घ्या Schedule



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *