Raksha Bandhan 2026: अवघ्या देशभरात ज्या सणाची आतुरतेने वाट पाहण्यात येत आहे, तो रक्षाबंधनचा सण यंदा 28 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधन सण हा भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. या दिवशी राखी बांधण्याशी संबंधित अनेक धार्मिक परंपरा आहेत. मात्र काही कुटुंबांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी बांधण्याची परंपरा आहे. ही प्रथा नेमकी का पाळली जाते, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता असते. जाणून घेऊया या परंपरेबद्दल, आणि धार्मिक मान्यतेबाबत…
रक्षाबंधनाला सर्वप्रथम बाप्पााला राखी का बांधतात? या परंपरेबद्दल जाणून घ्या.. (Raksha Bandhan 2026)
काही ठिकाणी कौटुंबिक परंपरेनुसार, रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी, गणपतीला राखी अर्पण करण्याची परंपरा मानली जाते. याचं कारण म्हणजे हिंदू धर्मपरंपरेत भगवान गणेशाला विघ्नहर्ता आणि शुभकार्याचा अधिपती मानले जाते. कोणतेही मंगलकार्य सुरू करण्यापूर्वी गणेशपूजन करण्याची प्रथा आहे. त्याच भावनेतून काही कुटुंबांमध्ये रक्षाबंधनाच्या विधीलाही प्रथम गणेशपूजन करून गणेशाला राखी किंवा रक्षासूत्र अर्पण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, गणेशाला प्रथम राखी बांधल्याने रक्षाबंधनाचा विधी निर्विघ्नपणे पार पडावा, कुटुंबावर मंगलकृपा राहावी आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी श्रद्धा आहे. त्यानंतर बहिण भावाला राखी बांधते..
बाप्पाला प्रथम राखी कशी बांधावी? पूजा पद्धत…
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथम घरातील देवघर स्वच्छ करून भगवान गणेशाची पूजा करावी. त्यानंतर गणेशाला राखी अर्पण करून भावाला राखी बांधण्याची प्रथा काही कुटुंबांत पाळली जाते. पूजा साहित्य – कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, धूप-दीप, नैवेद्य, पाणी आणि राखी.
पूजा पद्धत…
- सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
- गणेशमूर्तीसमोर दिवा लावून धूप दाखवावा.
- गणेशाला पाणी, कुंकू, अक्षता, फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात.
- गणेशाची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवावा.
- गणेशाला राखी अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
- त्यानंतर भावाला पाटावर बसवून औक्षण करावे.
- भावाच्या कपाळावर कुंकू किंवा गंध लावून अक्षता लावाव्यात.
- उजव्या मनगटावर राखी बांधावी आणि मिठाई भरवावी.
- भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देऊन तिच्या सुख-समृद्धीची कामना करतो.
गणेशाला राखी बांधण्यामागे आणखी एक श्रद्धा
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गणेश हे बुद्धी, विवेक आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे राखी बांधताना गणेशाचे स्मरण केल्याने भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि संरक्षणाची भावना कायम राहावी, अशी धार्मिक भावना व्यक्त केली जाते.
गणपतीला राखी बांधणे आवश्यक आहे का?
गणेशाला राखी बांधणे ही श्रद्धेची बाब असून, ज्या कुटुंबात ही परंपरा आहे त्यांनी ती भक्तिभावाने पाळू शकतात. रक्षाबंधनाचा मुख्य भाव मात्र भाऊ-बहिणीतील प्रेम, स्नेह आणि परस्पर रक्षणाची भावना हाच आहे.प्रत्येक कुटुंबात हा एक अनिवार्य विधी म्हणून पाळला जात नाही. अनेक कुटुंबांमध्ये रक्षाबंधनाची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते, तर काही ठिकाणी भावाला थेट राखी बांधण्याची परंपरा पाळली जाते.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – 28 ऑगस्ट 2026
रक्षाबंधन: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026
पौर्णिमा तिथी: 27 ऑगस्ट सकाळी 9:07 पासून 28 ऑगस्ट सकाळी 9:47 पर्यंत.
राखी बांधण्याचा शुभ काळ: 28 ऑगस्ट सकाळी 6:18 ते 9:47.
तसं पाहायला गेलं तर रक्षाबंधनच्या दिवशी संपूर्ण दिवस कधीही राखी बांधता येते.
मुहूर्त स्थानिक सूर्योदय आणि पंचांगानुसार काही मिनिटांनी बदलू शकतो, त्यामुळे आपल्या शहराचे पंचांग पाहणे उत्तम.
बाप्पाची पूजा केल्यानंतर आपल्या भावाला राखी बांधावी…
धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून आणि त्यांना राखी अर्पण केल्यानंतर, आपल्या भावाला राखी बांधली जाते. सर्वप्रथम, भावाच्या कपाळावर टिळा लावला जातो. तांदळाच्या दाण्यांनी आरती केली जाते आणि नंतर त्याच्या मनगटावर राखी बांधली जाते. राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई खाऊ घातली जाते. भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन संरक्षण, सुख आणि समृद्धीसाठी शुभेच्छाही देतात.
हेही वाचा :
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे की भावाने बहिणीकडे? धार्मिक मान्यता काय सांगते? जाणून घ्याच…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)