आंबेडकरी चळवळीतील नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत सामील होणार? – Marathi News | Sachin kharat meets devendra fadnavis may give support to mahayuti once again


हिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकतो, अशी चर्चा रंगली होती. पडद्यामागे तशा घडामोडीही वाढल्या होत्या. राजकीय वर्तुळात या चर्चेला जास्तच हवा मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी समोर येत आम्ही विरोधातच असू, असं स्पष्टीकरण दिलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील समोर येत आता महायुतीत कोणताही नवा पक्ष येणार नाही, असं सांगून टाकलं होतं. दरम्यान, आता ही चर्चा मागे पडलेली असतानाच वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या आहेत. महत्त्वाचा नेता फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे. आता शरद पवार यांची राष्ट्रवादी नव्हे तर आरपीआय (खरात गट) पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे.

वर्षावर नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार आरपीआय (खरात गट)चे सचिन खरात वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्या पक्षाचा राज्यात एकही खासदार नाही किंवा आमदारही नाही. परंतु आंबेडकरी विचारांचे नेते म्हणून खरात यांना ओळखले जाते. सचिन खरात सोबत आले तर महायुतीला भविष्यात आंबेडकरवादी , बहुजनांची मतं मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना आता सचिन खरात हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीचा सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. याआधी खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा खरात गट महायुतीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

महायुतीसाठी दलित मतं किती गरजेची?

दरम्यान, महायुतीसाठी आंबेडकरवादी, बहुजनांची मतं खूप गरजेची आहेत. हिंदुत्त्वाच्या नावाखाली महायुतीतील शिंदे गट आणि भाजपा हे एकत्र आलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरून नंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीही त्यांच्यात सामील झाली. परंतु आम्ही सर्वसमावेशक आहोत, आम्हाला समजातील तळागाळातील लोकांसाठी काम करायचे आहे, आमचे सरकार हे आंबेडकरवादी मतदारांच्या हिताचे  आहे, हा संदेश देण्यासाठी महायुतीमध्ये एखादा आंबेडकरवादी चेहरा असणे गरजेचे आहे.  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेदेखील महायुतीमध्ये सामील आहेत. असे असताना खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिला तर भविष्यात त्याचे काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *