आपल्याकडे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यापैकीच काही फोटो, आंदोलनकर्ते मुलं मुली पोलिसांना फुले देतानाचे आहेत! हे फोटो पाहून, ‘द गर्ल विथ द फ्लॉवर’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेली जेनरोज कास्मिर हिची आठवण झाली. जेनचा एक फोटो जगभरात व्हायरल असलेल्या शंभर फोटोंपैकी एक आहे!
जेव्हा हा फोटो काढला गेला तेव्हा जेन कास्मिर फक्त सतरा वर्षांची होती, आणि त्या वयात देखील तिने युद्धविरोधी चळवळीला पूर्णपणे वाहून घेतले होते. व्हिएतनाममधील युद्ध हे अमेरिकन साम्राज्यवादाचे एक भयानक रूप होते आणि तिथे अमेरिकन सैन्याच्या अस्तित्वाचे काहीही कारण नव्हते असे तिला वाटायचे.
अमेरिकेच्या व्हिएतनाम विरोधातील युद्धखोर नीतीविरोधात पेंटागॉनवरील मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी जेन एकटीच गेली होती. जेन तिथे पोहोचली, तेव्हा लोक मोठ्या संख्यने लिंकन मेमोरियल रिफ्लेक्टिंग पूलजवळ जमले होते. पेंटागॉनकडे चालत जात असताना, मी “व्हिवा चे, व्हिवा चे” अशी घोषणा देणाऱ्या गर्दीत जेन देखील सामील झाली. विशेष म्हणजे त्या दिवसापर्यंत जेनने चे गेवाराबद्दल कधीच काहीही ऐकलं नव्हतं.
हा जत्था पेंटागॉनच्या जवळ पोहोचताच, आंदोलकांना आत शिरण्यापासून रोखण्यासाठी नॅशनल गार्डने अडथळ्याची भिंत उभी केली होती. तिथेच कोणीतरी फुले वाटत होते, आणि त्यामुळेच नकळत जेनच्या हाती शेवंतीचे एक फूल आले. या दरम्यान सैनिकांनीही आपल्या बाजूने सामील व्हावे म्हणून जेन त्यांना खुणावत होती. आपण कोणत्या धोक्यात आहोत हा विचार तिच्या मनातच आला नाही! केंट स्टेटच्या आधीची गोष्ट असल्याने आपल्याला कुणी मारून टाकेल अशी भीती तिच्या मनात कधीच दाटली नाही.
मानवी भिंत बनवून उभ्या असलेल्या पोलिसांपैकी कोणीही तिच्या नजरेस नजर मिळवली नाही. त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. पण नंतर फोटोग्राफरने जेनला सांगितले की, ते पोलीस थरथरत होते! आंदोलकांवर गोळीबार करायला सांगितले जाईल या भीतीने त्यांना ग्रासलं होतं. तरीही जेनने ठरवलं की, यांना किमान एक फुल तरी सदिच्छेचे, प्रेमाचे प्रतीक म्हणून दिले पाहिजे!
आपण जर बारकाईने जेन कास्मिरच्या चेहऱ्याकडे पाहिले तर लक्षात येते की, त्या फोटोत जेन अत्यंत दु:खी दिसते! कारण प्रत्यक्षात फुल देताना जेनने आजूबाजूला पाहिले आणि तिच्या लक्षात आले की, आजूबाजूला अनेक कोवळी मुलंमुली होती! इतर कोणाप्रमाणेच तेही युद्धयंत्रणेचे बळी होते.
अनेक वर्षांनंतर, जेनने ते चित्र पहिल्यांदा प्रदर्शनात पाहिले, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले; त्या स्मृतींनी त्या अथांग दुःखात खपली पुन्हा निघाली. कारण तिचा फोटो कुणी काढला आहे आणि तो इतका व्हायरल झाला आहे याची तिला कल्पना नव्हती. घटनेच्या दिवशी अंधार पडेपर्यंत, ती आंदोलनस्थळीच थांबली आणि मग बसने घरी परतली होती. तिच्यासाठी तो काही विशेष घडामोडींचा दिवस नव्हता.
ऐंशीच्या दशकात तिला तो फोटो सापडला. तिचे वडील स्कॉटलंडला गेले होते आणि त्यांनी एक फोटोग्राफी मासिक विकत घेतले. ते उघडल्यावर त्यांना त्यात त्यांची मुलगी दिसली. मॅग्नममार्फत फोटोग्राफर मार्क रिबौड यांना तिने पत्र लिहिले, “फोटोतली मुलगी मीच आहे. तुम्हाला माझ्या पत्त्याची निकड असेल की नाही हे मला माहीत नाही, पण हा माझा पत्ता आहे.” पत्रात तिने पत्ता पाठवला पण त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. जेन रोझ, वयाच्या चाळीशीत पोहोचेपर्यंत ती कोण आहे यात लोकांना स्वारस्य नव्हते! आणि वृत्तसंस्थांनीही तिच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली नव्हती.
मागे वळून पाहताना जेन रोझला वाटतं की तो एक अविश्वसनीय काळ होता. ती टिन एजर होती. तिथे कम्युनिस्ट, व्हाईट पँथर्स , ब्लॅक पँथर्स आणि इतर अनेक गट होते. काय विचार करावा हेच तिला कळत नव्हतं. मेरीलँडमधील माँटगोमेरी कॉलेजच्या तिच्या कॅम्पसमध्ये एका मोठ्या विद्यार्थी संपाचे तिने नेतृत्व केले, पण तो संप हळूहळू थंडावला.
जेन आता पंच्याहत्तरहुन अधिक वर्षांची आहे आणि आजही तिला वाटते की, तो काही क्षणिक मूर्खपणा नव्हता, ती एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी उभी होती!
आपल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना, सुरक्षा दलाच्या जवानांना, जंतर मंतरवर फुलं देणाऱ्या मुलामुलींच्या मनात कोणत्या भावना असतील हे नेमके सांगता येत नाही मात्र ही मुलं जे काही करत आहेत तो काही क्षणिक भावनाविवश होण्यातला वा लाटेवर स्वार होऊन केलेला मूर्खपणा नक्कीच नाही! ही सर्व मुलं एका महत्वाच्या गोष्टीसाठी उभी आहेत, जशी जेन रोझ कास्मिर उभी होती!
जेंव्हा जेंव्हा आपल्या विरोधात बंदुका. लाठ्या ताणुन पोलीस उभे असतील आणि समोरील आंदोलनकर्त्यापैकी कुणीही त्यांना फुल देत असेल तेव्हा तेव्हा जेन रोज कास्मिरची आठवण काढली जाईल!
इतिहास त्या पोलिसांची, त्या मारेकऱ्यांची आठवण कधीच काढणार नाही ज्यांना ह्या मुलामुलीनीं फुलं दिली आहेत! मात्र ह्या बहादूर, धाडसी, विनम्र मुलामुलींची आठवण नेहमीच काढली जाईल! आंदोलने अशा बारीक सारीक गोष्टींनीच मोठी होत असतात!
काही नोंदी : जेन रोझने पुढे जाऊन आपल्या अनुभवांवर आधारलेलं पुस्तक लिहिलं, जे बेस्टसेलर ठरलं. ऑल यु नीड इज लव्ह, हा विचार तिच्या जगण्याचा आधार आहे! फोटो काढला गेला तेव्हा ती चक्क शाळकरी मुलगी होती!
जेनला वाटते की, कोवळ्या वयात क्रांतिकारी विचार अधिक साद घालतात आणि भीतीला फाट्यावर मारून विरोधात उभं राहणं तेव्हा अधिक सोपं जातं!
जेन रोझ आता पूर्णवेळ शांततावादी कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे.