Naseeruddin Shah Cries Seeing Violence With Students: NEET पेपरफुटीच्या प्रकरणावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’नं (CJP) आयोजित केलेलं आंदोलन आणि त्यानंतरचा ‘संसद मोर्चा’ आता एका मोठ्या जनआंदोलनात रूपांतरित झाला. 20 जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ रॅलीदरम्यान आंदोलक आणि विद्यार्थ्यांशी केलेली कठोर वागणूक आणि त्यांना पांगवण्यासाठी, आंदोलन मोडीत काढण्यासाठी करण्यात आलेली कारवाई यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. शबाना आझमी (Shabana Azmi), कुनिका सदानंद (Kunika) आणि प्रकाश राज (Prakash Raj) यांसारख्या बड्या व्यक्तिमत्त्वांनी जंतर-मंतरला भेट दिली, तसेच अनेक इतर कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली. आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Veteran Actor Naseeruddin Shah) यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. विद्यार्थ्यांवरील हल्ला आणि लाठीचार्ज पाहून ते अत्यंत संतापलेले आणि भावूक होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रूही ओघळल्याचं पाहायला मिळालं.
76 वर्षीय अभिनेत्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय, जो पाहून आपलंही काळीज पिळवटतं. व्हिडीओमध्ये नसरुद्दीन शाह यांचे डोळे पाणावलेले दिसत होते. यापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह आपल्या दोन मुलांसह जंतर-मंतरवरील CJP च्या आंदोलनात सहभागी झालेले आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हतबल होऊन पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत होते, असा दावा केला गेला होता. मात्र, ती दृश्य प्रत्यक्षात मुंबईतील एका स्क्रीनिंग कार्यक्रमातील होती. आता मात्र, नसीरुद्दीन शाह यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी एक अत्यंत भावूक करणारा व्हिडीओ शेअर केलाय.
नसरुद्दीन शाह यांनी मारहाण करणाऱ्यांना ‘गुंड’ म्हटलंय…
जंतर-मंतर इथे ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराबाबत नसीरुद्दीन शाह यांनी आपलं मौन सोडलंय आणि आंदोलकांवर लाठी चालवणाऱ्यांचा उल्लेख ‘गुंड’ असा केलाय. तसेच, ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. हे आंदोलन आता मुंबईपर्यंत पोहोचलं असून, त्यामुळे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
“मी माझ्या प्रत्येक श्वासासह त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय…”
व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणाले की, “नमस्कार, आदाब… मी नसीरुद्दीन शाह, आपल्या सर्वांसोबत दोन विचार मांडू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे, जर एखाद्या अज्ञानी व्यक्तीच्या हाती या देशाची सूत्रं असतील, तर साहजिकच त्या व्यक्तीची अशी इच्छा असेल की, संपूर्ण राष्ट्रही त्याच्यासारखंच बनावं, म्हणजेच अज्ञानी… समजशक्ती नसलेलं, अकार्यक्षम आणि निर्दयी. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि पुणे फिल्म इन्स्टिट्यूट अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी अभिनयाचं प्रशिक्षण घेऊनही, अभिनयाबाबत मला जी सर्वात महत्त्वाची शिकवण मिळाली, ती मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडूनच मिळाली… माझी मनापासूनची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासह त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि ‘शिक्षक दिना’च्या निमित्तानं त्यांना सलाम करतो.”
नसरुद्दीन शाह पुढे बोलताना म्हणाले की, “”माझं मन अत्यंत व्यथित झालंय आणि त्या गुंडांनी, ज्यांनी तोंडावर मुखवटे घातलेत आणि हातात काठ्या घेतल्यात, आणि जे मला अमेरिकन एजंट्सची आठवण करून देतात, आपल्या मुलांवर जी क्रूरता केलीय, ती पाहून मी संतापानं खवळलोय. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांचाही विचार केला पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की, एक दिवस तुम्हालाही तुमच्या कृत्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. या सर्व तरुणांना मला हेच सांगायचंय की, धीर सोडू नका. अनेक लोक तुमच्याशी सहानुभूती बाळगून आहेत आणि तुमच्या पाठीशी उभे आहेत. लढा सुरू ठेवा… मला आपल्या देशातील तरुणांबद्दल नेहमीच आशा वाटत आली आहे आणि ती आशा आता अधिकच दृढ झाली आहे… तुमचा संघर्ष चालू ठेवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत…”
दिल्लीच्या आंदोलनाची झळ मुंबईपर्यंत…
दरम्यान, ही आंदोलनं आता केवळ दिल्लीपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) समर्थकांनी मुंबईतही रस्त्यावर उतरून निदर्शनं करण्यास सुरुवात केलीय. संभाव्य अशांतता रोखण्यासाठी, मुंबई पोलिसांनी 23 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र जमण्यावर, मिरवणुका काढण्यावर, लाऊडस्पीकरच्या वापरावर आणि फटाके फोडण्यावर बंदी घातलीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :