आधार कार्डचा जुना मोबाईल नंबर कसा बदलायचा? ऑनलाईन प्रोसेस अगदी सोपी


आधार कार्डमधील जुना मोबाईल नंबर पूर्णपणे ऑनलाइन बदलता येत नाही, कारण यासाठी बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असते. मात्र, आधार केंद्रावरील रांगा टाळण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून अवघ्या काही मिनिटांत ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि फसव्या व्हिडिओंना बळी न पडता काम सहज होईल. चला तर मग जाणून घेऊया.

Update Aadhaar Address । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुम्हाला आधार केंद्रावर जायचे नसेल, तर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) ऑनलाईन पोर्टलवरून ‘डोअरस्टेप सर्व्हिस’ बुक करण्याचा सोपा पर्याय उपलब्ध आहे. या सुविधेमुळे पोस्टमन स्वतः बायोमेट्रिक मशीन घेऊन तुमच्या घरी येईल आणि केवळ 50 रुपये शुल्कात तुमच्या आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर यशस्वीपणे लिंक करून देईल.

सोशल मीडियावर 2 मिनिटांत घरबसल्या आधारचा मोबाईल नंबर बदला, असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. परंतु, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या सुरक्षा नियमांनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव आधारमधील मोबाईल नंबर पूर्णपणे ऑनलाइन घरातून बदलता येत नाही. यासाठी तुमचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य असते. मात्र, तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा वापर करून तुमचा वेळ नक्कीच वाचवू शकता.

नंबर बदलण्यासाठी सध्या देशात दोनच सर्वात सोपे आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करून आधार केंद्रावर जाणे

आधार केंद्रावरील लांबच लांब रांगा टाळण्यासाठी तुम्ही आधीच ऑनलाइन वेळ (Slot) बुक करू शकता. यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:

ऑनलाईन कसा अपडेट करावा?

  • सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला (uidai.gov.in) भेट द्या.
  • ‘My Aadhaar’ या पर्यायावर जाऊन ‘Book an Appointment’ वर क्लिक करा.
  • तुमचे शहर किंवा जवळचा परिसर निवडा आणि ‘Proceed to Book Appointment’ वर क्लिक करा.
  • तुमचा चालू मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून OTP जनरेट करा.
  • लॉगिन झाल्यानंतर ‘Aadhaar Update’ चा पर्याय निवडा आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर अचूक भरा.
  • तुम्हाला सोयीची वाटणारी तारीख आणि वेळ निवडून 50 रुपये अधिकृत फी ऑनलाईन किंवा केंद्रावर भरण्याचा पर्याय निवडा.

तुम्हाला मिळालेली अपॉइंटमेंट स्लिप घेऊन ठराविक वेळेत जवळच्या आधार सेवा केंद्रावर जा. तिथे तुमचे बायोमेट्रिक्स घेतले जातील आणि केवळ 5 मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होईल.

पोस्टमनच्या माध्यमातून घरबसल्या अपडेट करा

तुम्हाला आधार केंद्रावर जाणे शक्य नसेल, तर ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक’ (IPPB) ने ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी एक उत्तम सुविधा सुरू केली आहे.

असेही मोबाईल नंबर अपडेट करू शकता

  • गुगलवर जाऊन ‘IPPB Doorstep Banking’ सर्च करा किंवा त्यांच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  • तिथे ‘Service Request Form – Institutional/General’ मध्ये ‘CELC – Aadhaar Mobile Update’ हा पर्याय निवडा.
  • तुमचे नाव, पत्ता, पिनकोड आणि नवीन मोबाईल नंबर भरून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म भरल्यानंतर, तुमच्या भागातील पोस्टमन बायोमेट्रिक मशीन घेऊन थेट तुमच्या घरी येईल.
  • घरबसल्या तुमचे फिंगरप्रिंट घेऊन नवीन मोबाईल नंबर लिंक केला जाईल. यासाठी पोस्टमनला 50 रुपये अधिकृत शुल्क द्यावे लागेल.

नंबर अपडेट होण्यासाठी किती वेळ लागतो?

आधार केंद्रावर किंवा पोस्टमनद्वारे बायोमेट्रिक दिल्यानंतर सिस्टीममध्ये तुमचा नवीन नंबर अपडेट होण्यासाठी साधारणपणे 24 ते 72 तास (1 ते 3 दिवस) लागतात. काही प्रकरणांमध्ये याला जास्तीत जास्त 7 दिवस लागू शकतात. नंबर अपडेट झाल्यावर तुमच्या नवीन मोबाईलवर UIDAI कडून यशस्वी झाल्याचा मेसेज येतो.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा