मुंबई : दिल्लीत सोनम वांगचुक (Sonam wangchuk) यांचे 20 दिवसांपासून उपोषण सुरू असून आज सकाळीच दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे, आता देशभरातून संताप व्यक्त होत असून सरकारने हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केलाय. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पाठिंबा दिला जात आहे. दिल्लीतील याच आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी 64 वर्षांच्या आजी सोलापूरहून मुंबईत (Mumbai) आल्या आहेत. मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी आंदोलनास पाठिंबा देत, वैज्ञानिक देशासाठी जीव द्यायला तयार, पण धर्मेंद्र प्रधान खुर्ची सोडायला तयार नाहीत, असे म्हणत हल्लाबोल केला.
राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत असून मुंबईतील आझाद मैदानातही कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केले आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनात सोलापुरातून आजी आल्याचं पाहायला मिळालं. राजश्री रामचंद्र जालनापुरे या 64 वर्षांच्या आजी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सोलापूरहून मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थीनी असून मी या भ्रष्ट व्यवस्थेची व्हिक्टीम असल्याचं त्यांनी म्हटलं, त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्या व्हिडिओतून त्यांनी देशातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 64 वर्षीय आजी राजश्री जालनापुरे ह्या बार्शी येथील राजर्षि शाहू लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत.
नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुम्ही म्हणता आम्हाला विकास करायचा, पण विकासाचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना मारुन तुम्ही विकास करणार का, असा संतप्त सवाल या आजीबाईंनी सरकारला विचारला. तुम्ही जे खातं चालवताय, त्यावरुन पेपरफुटीच्या एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आम्ही देशातील प्रतिभाशाली विद्यार्थी गमावतोय. मग, तुम्हाला खुर्चीची एवढी हाव का? आज आपल्या देशाचा वैज्ञानिक देशासाठी जीव द्यायला तयार आहे, तुम्ही खुर्ची सोडायला तयार नाहीत. ती खुर्ची काय तुम्हाला वारसा हक्काने मिळालीय का? असा सवालही आजीने संतप्तपणे विचारला. दरम्यान, इंस्टाग्रामवर एका फ्री लान्सर, भटकता पत्रकार या अकाऊंटवरुन या आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला असून 64 वर्षीय विद्यार्थीनी असलेल्या आजीला नेटीझन्स सपोर्ट करत असल्याचंही दिसून येत आहे.
हेही वाचा
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’