मुसळधार पाऊस कधी येणार? हवामान विभागाने सांगितली नवी तारीख! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, २४ ते ४८ तासांत १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट. २२ जुलैनंतर धो-धो पावसाचा अंदाज.

पावसाचा अंदाज
पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून बळीराजावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. पण, आता बळीराजासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे.

येत्या २४ ते ४८ तासांत राज्यात मान्सून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भ-मराठवाड्याच्या बहुतांश भागांसह राज्यातील १३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या आधीच वरुणराजा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावणार आहे.

 उन्हाचा चटका आणि अधूनमधून सरी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली होती. गुरुवारी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या, तर मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अद्याप म्हणावा तसा मुसळधार पाऊस न झाल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा खालावला आहे. हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले असून लवकरच वातावरणात मोठा बदल होणार आहे.

२२ जुलैनंतर ‘धो-धो’ पाऊस; काय सांगतो हवामान अंदाज?

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर दोन मोठे बदल होत आहेत, ज्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.

२२ जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पावसाला सुरुवात होईल. २६ जुलैपासून सुरू होणारा संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाचा राहील. जुलै अखेरीस संपूर्ण महाराष्ट्र चांगल्या पावसाने चिंब भिजलेला असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, भूमध्य रेषेच्या जवळ असणारे ‘BSISO’ (Boreal Summer Intra-Seasonal Oscillation) पॉझिटिव्ह टप्प्यात पोहोचले आहे. तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रणाली एकत्र आल्यामुळे २० ते ३० जुलै दरम्यान देशात तुफान पाऊस होईल.

शनिवारपासून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी सुरू होईल. रविवार-सोमवारपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा जोर वाढेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे आणि ढगफुटी सारख्या आपत्ती ओढवू शकतात. त्यामुळे पर्यटकांना पुढील काही दिवस प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *