Krushnaichya Leki Marathi Serial: झी मराठीवरील (Zee Marathi) ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki) या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर (Anushka Pimputkar) ‘जिगिशा’ ही रंगतदार आणि बहुरंगी व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. Gen Z विचारसरणी, महत्त्वाकांक्षा आणि विविध छटांनी सजलेली जिगिशा ही व्यक्तिरेखा आहे. या भूमिकेमुळे प्रेक्षकांना तिच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचीही झलक पाहायला मिळेल, असे अनुष्का सांगते. या नव्या भूमिकेबद्दल, तिची तयारी आणि ‘कृष्णाईच्या लेकी’च्या प्रवासाविषयी अनुष्काने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर म्हणाली की, “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव जिगिशा आहे. ती एकदम Gen Z मुलगी आहे. जिगिशाची आई आणि मातोश्री या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे जिगिशाच्या आईने तिचं लग्न मातोश्रींचा मुलगा, म्हणजे शंकरसोबत ठरवलं आहे. तिने जिगिशाला अगदी स्पष्ट सांगितलं आहे की, शंकरशी पैशांसाठी लग्न करायचं आहे. शंकर हा मातोश्रींच्या शब्दाबाहेर नाही, हे जिगिशाला माहिती आहे. त्यामुळे ती सतत मातोश्रींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते. पण जिगिशा या व्यक्तिरेखेची गंमत अशी आहे की तिच्या अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. मातोश्री आजूबाजूला नसतात तेव्हा ती पूर्णपणे स्वतःसारखी असते. शंकरसोबत तिचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं आणि तिची आईसोबत ती अगदी खरी जिगिशा असते. मला वैयक्तिकरित्या या तीन वेगवेगळ्या छटा साकारायला खूप मजा येत आहे. खरं तर या भूमिकेसाठी माझी निवड होण्यामागेही एक छोटीशी गोष्ट आहे.जेव्हा मला या शोसाठी प्रोडक्शनकडून फोन आला, तेव्हा मी आधीच एका प्रोजेक्टचा भाग होते आणि मी एक चित्रपटही साइन केला होता…”
“योगायोग असा झाला की, त्यांनी ज्या महिन्यात शोचं शूटिंग सुरू होणार असल्याचं सांगितलं, त्याच महिन्यात माझ्या चित्रपटाचंही शुटिंग होतं. चित्रपट मी आधीच साइन केला होता, त्यामुळे माझी पहिली जबाबदारी तिकडे होती. पण मला हा ‘कृष्णाईच्या लेकी’ शोही करायचा होता. कारण मला ही व्यक्तिरेखा खूप आवडली होती. त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तारखांच्या अडचणीमुळे कदाचित मला हा शो करता येणार नाही. त्यामुळे मी थोडी नाराज झाले होते. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट तुमच्या नशिबात असेल तर ती नक्की घडते. चॅनेल आणि प्रोडक्शन टीमने माझ्या तारखा इतक्या छान पद्धतीने जुळवून घेतल्या की मला चित्रपटाचं शूटिंगही करता आलं आणि त्यानंतर या शोचाही भाग होता आलं. जेव्हा मला या शोबद्दल आणि माझ्या व्यक्तिरेखेबद्दल, म्हणजे जिगिशाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा मला थोडं आश्चर्यही वाटलं आणि खूप आनंदही झाला. कारण दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह टीम मला आधीपासून ओळखत होती. साधारण वर्षभरापूर्वी आम्ही एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी भेटलो होतो. मलाही ओशन फिल्म्स प्रोडक्शन आणि झी मराठी सोबत काम करायचं होतं आणि त्यांनाही माझ्यासोबत काम करायचं होतं. त्यांनी मला जिगिशासाठी फक्त एकच ब्रीफ दिलं, “तू जशी आहेस, तसंच हे पात्र साकारायचं.” त्यामुळे मला हा रोल करताना खूप मजा येते आहे. या व्यक्तिरेखेमुळे मला माझ्या खऱ्या स्वभावाचा एक भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येत आहे.”, असं अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर म्हणाली.
View this post on Instagram
पुढे बोलताना अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर म्हणाली की, “शुटिंगचा पहिला दिवस खरंच खूप भारी होता. मी एका चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि त्यासाठी साताऱ्यात होते. जेव्हा मला कळलं की आपल्या शोचं पहिलं शूटिंगही साताऱ्यातच होणार आहे. मला अक्षरशः वाटलं, “The stars are aligned!” आमचा पहिलाच सीन एका मंदिरात शूट होणार होता. या शोची सुरुवात फक्त देवाच्या नावानेच नाही, तर प्रत्यक्ष देवाच्या मंदिरातून होत होती. अर्थातच, शूटिंगचा पहिला दिवस म्हटलं की थोडी धावपळ आणि गोंधळ असतोच. कितीही पूर्वतयारी झाली असली तरी पहिला शॉट सुरू होईपर्यंत सगळ्यांच्याच मनात थोडी उत्सुकता आणि धाक धुक असते. त्या दिवशी गावातील खूप लोक शूटिंग पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे गर्दी सांभाळणं हे प्रोडक्शन टीमसाठी मोठं आव्हान होतं. आमचे काही सीन आउटडोअर तर काही इंडोअर असतात. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे रोज काही ना काही नवीन आव्हान असतंच. कधी शूटिंगच्या ठिकाणी पोहोचणंसुद्धा मोठं टास्क असतं. पावसामुळे सगळीकडे चिखल झालेला असतो. त्यातून कॉस्ट्यूम आणि बाकीचं सगळं सांभाळत लोकेशनपर्यंत पोहोचावं लागतं. आउटडोअर शूटिंगमध्ये तर अनेकदा सीन सुरू असताना अचानक पाऊस सुरू होतो. मग शूटिंग थांबवावं लागतं, पण या सगळ्यातही आम्ही मजा शोधतोच. पावसामुळे थोडा ब्रेक मिळाला की लगेच कोणीतरी म्हणतं, “आता कांदा भजी होऊन जाउदे !” मग चहा, कांदा भजी आणि पाऊस… सेटवरच आमची छोटीशी पावसाळी पिकनिक सुरू होते…”
“जसं मी आधी म्हटलं, मला निवेदिता ताईंसोबत खूप आधीपासून काम करायचं होतं. एक अभिनेत्री म्हणून तर त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंच, पण एक माणूस म्हणूनही त्या खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. त्या रोज आमच्यासाठी काही ना काही खायला घेऊन येतात. त्या फक्त पडद्यावर आईची भूमिका करत नाहीत, तर सेटवरही आमची तितकीच काळजी घेतात. माझ्या आईची भूमिका करणाऱ्या नंदिनी ताईंबद्दलही मी हेच म्हणेन. त्या स्वतःसाठी जे आणतात, ते माझ्यासाठीही घेऊन येतात. सेटवर सगळे आम्हाला म्हणतात, “तुमच्या दोघींची कास्टिंग अगदी परफेक्ट आहे. खरंच आई-मुलगी वाटता.” झी मराठीवर काम करण्याची इच्छा मला खूप आधीपासून होती. लहानपणापासून मी झी मराठीच्या मालिका पाहत आले आहे. माझी आजी, आई… सगळेच झी मराठीच्या मालिका पाहायचे आणि त्यांच्यासोबत मीही त्या मालिका पाहत मोठी झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून माझ्या मनात होतं की मला झी मराठीवर काम करायचं आहे. मेघन तर ‘लक्ष्मी निवास’मुळे आधीपासूनच झी मराठीचा भाग आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मुळे मलाही झी मराठीच्या कुटुंबाचा भाग होता आलं आहे. गमतीची गोष्ट म्हणजे ‘लक्ष्मी निवास’ चं शूटिंग आणि ‘कृष्णाईच्या लेकी’ चं शूटिंग अगदी बाजूबाजूलाच होत. पूर्वी असं व्हायचं की तो त्याच्या शूटिंगला जायचा आणि माझं शूटिंग दुसऱ्याच ठिकाणी असायचं. त्यामुळे एकत्र येणं-जाणं फारसं होत नव्हतं. पण आता या शोमुळे सकाळी मला शूटिंगला सोडण्यापासून ते माझं पॅकअप झाल्यावर मला घरी घेऊन जाण्यापर्यंत या गोष्टी नेहमीच्या झाल्या आहेत. आता चॅनेलचे कार्यक्रम किंवा इतर इव्हेंट्स असतील, तर त्या निमित्तानेही आम्ही एकत्र काम करणार आहोत. त्यासाठीही मी खूप उत्सुक आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आता आम्हाला एकत्र खूप वेळ घालवता येतो…”, असं अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर म्हणाली.
प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की, ‘कृष्णाईच्या लेकी’ या आमच्या मालिकेला भरभरून प्रेम द्या. माझ्या जिगिशा या व्यक्तिरेखेलाही तितकंच प्रेम द्या.अनेक मनोरंजक वळणं आणि नवीन घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.