Last Updated:
गोंदियात मोकाट कुत्र्यांनी ७ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला. शेजारच्या महिलेमुळे तिचा जीव वाचला. शहरात कुत्र्यांची दहशत.
रवी सपाटे:
चिमुकली घराबाहेर उभी होती, चिमुकली एकटं असल्याचं पाहून क्षणात त्याने हेरलं आणि धावत तिच्या अंगावर धावून गेला. त्याच्या मागे संपूर्ण टोळी धावत आली आणि तिला घेरलं. एकाने पायावर, एकाने हातावर एकाने पोटावर धारधार दातांनी हल्ला करायला सुरुवात केली. चिमुकली जीव वाचवण्यासाठी दाराच्या दिशेनं पळाली मात्र काळ्या रंगाच्या कुत्र्याने तिला फरफटत दारापासून बाजूला केलं आणि सगळ्यांनी मिळून तिच्यावर हल्ला केला.
ती मोठ्याने रडायला लागली. जीव वाचवण्यासाठी ओरडायला लागली. चिमुकली घरासमोर उभी असतानाच मोकाट आणि हिंस्त्र कुत्र्यांच्या एका मोठ्या कळपाने चिमुकलीवर अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांनी तिला वेढून लचके तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यात ती जखमी झाली. मात्र, मुलीचा आरडाओरडा ऐकून एका शेजारील महिलेने दाखवलेल्या देवदूतासारख्या धाडसामुळे या चिमुरडीचा जीव थोडक्यात वाचला. या थरारक आणि वेदनादायी घटनेमुळे संपूर्ण गोंदिया शहरात सध्या मोकाट कुत्र्यांची दहशत आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही हृदयद्रावक घटना गोंदिया शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रिंग रोड परिसरातील मजारच्या मागे घडली. अवघी ७ वर्षांची चिमुरडी सकाळी सकाळी सुंदर पाठीवर दप्तर घेऊन, शाळेचा गणवेश घालून घराबाहेर उभी होती. ती वाहनाची किंवा घरच्यांची वाट पाहत असावी, तितक्यात परिसरात मोकाट फिरणाऱ्या ४-५ भटक्या कुत्र्यांच्या कळपाने तिला टार्गेट केले. काही सेकंदांतच या कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली.
अचानक झालेल्या या हल्ल्याने चिमुकली प्रचंड घाबरली. कुत्र्यांच्या हल्ल्यात ती किरकोळ जखमी झाली. तिने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिचा तो केविलवाणा आवाज ऐकून शेजारची एक महिला तातडीने घराबाहेर धावत आली. त्या महिलेने जीवाची पर्वा न करता कुत्र्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना तिथून पळवून लावले. जर त्या महिला काही सेकंद उशिरा आल्या असत्या, तर मोठा अनर्थ घडला असता.
कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका झाल्यानंतर ही चिमुरडी एवढी भयानक हादरली होती की, प्रचंड भीतीने आणि धक्क्याने तिची प्रकृती खालावली. तिच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. तिला कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, जिथे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Mumbai,Maharashtra
