मुंबई : बीएमसीच्या सभागृहात म्हणजेच मुंबई महापालिकेत (BMC) आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. चेंबूर दुर्घटना चौकशी अहवालाचा सभागृहात निषेध करत सभागृह नेते गणेश खणकर यांनी अहवाल फाडला, तर काँग्रेस गटप्रमुखांनी देखील चेंबूरचा विषय प्रथम न घेतल्यावरुन नाराजी व्यक्त केली. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असतानाच, सभागृहात विरोधकांची घोषणाबाजी व शाब्दिक चकमक सुरू असतानाच माजी महापौर तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांना चक्कर आल्याने काहीवेळ वातावरण भावुक झाल्याचं दिसून आलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष बाजूला होऊन माणुसकीचे दर्शन घडले.
चेंबूरमधील वृक्ष दुर्घटनेप्रकरणी सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालावरून मुंबई महापालिका सभागृहात मोठा गदारोळ झाला. अहवालावर तीव्र आक्षेप घेत सभागृह नेते गणेश खणकर यांनी सभागृहातच अहवाल फाडत निषेध व्यक्त केला. खणकर यांनी या अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, अहवाल एकतर्फी असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला. या प्रकरणाची निष्पक्ष आणि त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. चेंबूर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी व शाब्दिक चकमक सुरू असतानाच माणुसकीचे दर्शन घडले. आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना अचानक चक्कर आल्याने काही काळ सभागृहात बाहेर चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ही बाब लक्षात येताच महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर तसेच सत्ताधारी नगरसेवक तातडीने त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी किशोरी पेडणेकर यांना शांतपणे बसण्याची विनंती केली आणि त्यांची प्रकृती स्थिर होईपर्यंत काळजी घेतली. सभागृहात राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्ष कितीही तीव्र असला, तरी तो वैचारिक पातळीवरच असतो आणि प्रसंगावधान राखत एकमेकांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
दरम्यान, आज चेंबूरचा विषय प्रथम न घेता सत्ताधाऱ्यांनी अर्जंट बिझनेस सभागृहात आणला. या अर्जंट बिझनेसवर विरोधकांनी त्यांच्याकडे मतदान (पोल) मागितले. मात्र, सत्ताधाऱ्यांना चेंबूरच्या गंभीर विषयापेक्षा अर्जंट बिझनेस अधिक महत्त्वाचा वाटला. त्यांच्याकडे दोन-तृतीयांश (Two-thirds) बहुमत नसल्यामुळे हे काम मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी विशेष सभा बोलावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांची नाचक्की झाली. तर, मुंबई महापालिकेच्या मासिक सभेतून विरोधकांनी सभात्याग केल्याचं दिसून आलं.
पुन्हा विशेष सभा घेण्याची घोषणा
सभागृहात चेंबूर अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडावा अशी विरोधकांची मागणी होती. मात्र, महापौरांनी आधी नियमित कामकाज चालवण्याचा निर्णय घेतला. धारावी बेस्ट डेपो, आरेतील विकास कामाचा विषय तातडीच्या कामकाजात घेण्यात आला होता. मात्र, विकासाचे प्रस्ताव सभेत पारित करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे दोन तृतीयांश संख्या नसल्याने बहुमत चाचणी घेत असतानाच महापौरांनी अचानक निर्णय रद्द करत, पुन्हा विशेष सभा घेण्याची घोषणा केली. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांना कोणत्याही दुर्घटनेपेक्षा पैसे कमावणं महत्वाचं वाटतं असा आरोप विरोधकांनी केला.
हेही वाचा
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?