Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले


बीड : सुशिक्षित आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या नागरिकांनाही सायबर भामटे कसं सहज गंडवू शकतात, याचं एक धक्कादायक उदाहरण बीड जिल्ह्यातून समोर आलं आहे. बीडच्या गेवराई (Gevrai) येथील एका आयटी (IT) कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियरला शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतवणूक करून बंपर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आलं. त्यानंतर तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित इंजिनियरने बीड सायबर पोलीस ठाण्यात (Beed Cyber Police Station) धाव घेऊन दोन अज्ञात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.

Beed Cyber Crime : ‘सुनील’ नावाच्या व्यक्तीचा आला फोन, असा जिंकला विश्वास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई येथील आयटी इंजिनियर दत्तात्रय सूर्यभान खराद यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज आणि कॉल आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव सुनील असल्याचे सांगितले. आपण ‘ट्रेडिंग ॲडव्हायझरी’ (Trading Advisory) सेवा देत असून शेअर मार्केटमधून कमी दिवसांत खूप मोठा नफा मिळवून देऊ शकतो, असे आमिष त्याने दत्तात्रय यांना दाखवले.

त्यानंतर सुनीलने त्यांना विवेक नावाच्या ब्रोकरमार्फत स्वतःचे ट्रेडिंग खाते (Trading Account) उघडण्यास सांगितले. सायबर चोरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दत्तात्रय यांनी आपली ओळखपत्रे पाठवून सुरुवातीला 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

Fake SEBI Certificate : नुकसान भरपाईच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

तक्रारदाराचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने त्यांना ‘मार्केट प्लीज इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ आणि ‘भवानी स्टॉक ब्रोकर’ नावाच्या वेगवेगळ्या खात्यांवर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. काही दिवसांनंतर दत्तात्रय यांना शेअर होल्डिंग आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांवर 6 लाख 80 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास लावले. एवढ्यावरच न थांबता नफ्यातील हिस्सा देण्याच्या बहाण्याने आणखी 40 हजार रुपये उकळले.

आरोपी सतत आणखी पैशांची मागणी करत असल्याने दत्तात्रय यांना संशय आला. त्यांनी या कंपनीचे अधिकृत ‘सेबी’ (SEBI Securities and Exchange Board of India) नोंदणी प्रमाणपत्र मागितले. त्यावर सायबर चोरांनी त्यांना एक प्रमाणपत्र पाठवले, मात्र पडताळणी केली असता ते पूर्णपणे बनावट (Fake Certificate) असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच दत्तात्रय यांनी सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली.

शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगच्या नावाखाली अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी ती संस्था ‘सेबी’ नोंदणीकृत आहे की नाही, याची अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खात्री करा, असं आवाहन सायबर सेलने केलं आहे. 

ही बातमी वाचा: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *