पालघर : मुंबई आणि उपनगरात गेल्या 8 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यापैकी पालघर जिल्ह्यातील वसई-विरार (Vasai) आणि नालासोपारा येथील नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. वसई-विरारमध्ये मागील आठ दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. अनेक भाग पाण्याखाली गेले, घरांमध्ये पाणी शिरले, हजारो वाहने बंद पडली, नागरिकांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागले. अनेक ठिकाणी मदतीसाठी आक्रोश होत असतानाच आता परिस्थिती काहीशी सुरळीत होताच तुळींज पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी चालकांविरोधात कारवाईचा सपाटा लावल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नालासोपारा पूर्वेतील तुळींज परिसरात वसई वाहतूक शाखा आणि तुळींज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना अडवून दंडात्मक कारवाई सुरू केली. यातील अनेक जण पावसात बंद पडलेल्या गाड्या गॅरेजमध्ये नेण्यासाठी किंवा दुरुस्त करून परत आणण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगत होते. “पूराच्या काळात रस्त्यांवर साचलेले पाणी, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या अडचणी आणि मदतीच्या हाका याकडे प्रशासनाने अपेक्षेइतके लक्ष दिले नाही. मात्र, संकट ओसरताच दंडाची वही घेऊन यंत्रणा रस्त्यावर उतरली,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असली तरी, नैसर्गिक आपत्तीतून सावरत असलेल्या नागरिकांवर अशा वेळी दंडात्मक कारवाई करणे कितपत संवेदनशील आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. “संकटात आधार नाही, पण दंडासाठी सरकार आणि यंत्रणा कायम तयार,” अशी उपरोधिक चर्चा आता नालासोपारा परिसरात रंगू लागली आहे.
5 दिवसांचा पाऊस, उघडा पडला संसार
फक्त पाच दिवसांच्या मुसळधार पावसानं वसई-विरारकरांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं आहे. आता पाऊस थांबला… पाणीही ओसरलं… पण त्या पाच दिवसांच्या भीषण आठवणी आजही नागरिकांचा थरकाप उडवत आहेत. घरात घुसलेल्या पुराच्या पाण्यानं संसार उद्ध्वस्त झाला… फर्निचर, धान्य, कपडे, इलेक्ट्रिक वस्तूंचं मोठं नुकसान झालं. आजही अनेक सोसायट्यांच्या बाहेर भिजलेले सोफे, पलंग, गाद्या आणि कचऱ्याचे ढीग त्या संकटाची साक्ष देत उभे आहेत. सलग अनेक दिवस वीज नव्हती… मोबाईल नेटवर्क नव्हतं… बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. अंधारात, भीतीच्या छायेत आणि अनिश्चिततेत हजारो कुटुंबांनी दिवस काढले. विशेषतः महिला आणि लहान मुलांसाठी हा अनुभव अत्यंत भयावह ठरला. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असलं, तरी त्या पाच दिवसांची आठवण काढतानाही अनेकांचे डोळे पाणावतात. नेमकं काय भोगलं या नागरिकांनी? त्यांच्या मनात आजही कोणती भीती आहे? याच पूरग्रस्त नागरिकांच्या वेदना, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या भावना आता उघड्या पडलेल्या संसाराकडे पाहून दिसून येतात.
हेही वाचा
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj