देशातील सर्वात महागडा आणि सर्वात श्रीमंतांचा पत्ता म्हटला की एकच नाव समोर येतं… दक्षिण मुंबईतील अल्टामाउंट रोड आणि तिथे उभं असलेलं मुकेश अंबानी यांचं आलिशान निवासस्थान ‘अँटिलिया’. 27 मजली या इमारतीत अनेक सोयी-सुविधा, आलिशान जागा, मंदिर, वगैरे सगळं आहे. इथे रोज शेकडो कर्मचारी काम करतात. अँटिलियाची बरीच चर्चा असते, त्याच्या सजावटीचे, आतले अनेक फोटोही समोर येत असतात. लोकांना अंबानी कुटुंब, अँटिलिया याबद्दल जाणून घेण्याचीही खूपच उत्सुकता असते. पण अल्टामाउंट रोडवर केवळ अंबानीच नाहीत, तर भारतातील अनेक उद्योगसम्राट आणि अब्जाधीशांचाही मुक्काम आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, रेमंड समूहाचे गौतम सिंघानिया, दिग्गज गुंतवणूकदार मोतीलाल ओसवाल आणि अनेक नामवंत उद्योगपती याच परिसरात राहतात. त्यामुळे अल्टामाउंट रोडला भारताची ‘बिलियनेयर बेल्ट’ अशीही ओळख मिळाली आहे.
मुंबईतला सर्वात श्रीमंत रस्ता
मुंबईतील हा परिसर आलिशान बंगल्यांनी, गगनचुंबी निवासी इमारतींनी आणि अब्जावधी रुपयांच्या मालमत्तांनी सजलेला आहे. इथली प्रत्येक इमारत संपत्ती, प्रतिष्ठा आणि कॉर्पोरेट ताकदीची साक्ष देते. त्यामुळेच हा सर्वात श्रीमंत रास्ता आहे. इथे अंबानींचे शेजारी कोण आहेत, जाणून घेऊया सविस्तार..
एन. चंद्रशेखरन यांचं घर: टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन जसलोक रुग्णालयाजवळील एका डुप्लेक्समध्ये राहतात. टाटा समूहाच्या इतिहासातील पहिले गैर-पारशी आणि गैर-टाटा कुटुंबातील अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय उद्योगविश्वात नवा इतिहास रचला आहे.
मोतीलाल ओसवाल यांची आलिशान गुंतवणूक: मोतीलाल ओसवाल यांनी 2020 मध्ये ’33 साऊथ’मध्ये दोन लक्झरी अपार्टमेंट्स खरेदी केली. साध्या कुटुंबातून आलेल्या ओसवाल यांनी आज प्रति चौरस फूट तब्बल 1.48 लाख रुपयांच्या किमतीच्या घरापर्यंत मजल मारली आहे.
गौतम सिंघानिया यांचं ‘जेके हाऊस’: रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया ‘बिलियनेयर्स रो’जवळील ‘जेके हाऊस’मध्ये राहतात. त्यांचं हे निवासस्थान त्यांच्या उद्योगविश्वातील दबदबा आणि आलिशान जीवनशैलीचं प्रतीक मानलं जातं.
प्रशांत जैन यांचाही अँटिलियाशेजारी पत्ता: जेएसडब्ल्यू एनर्जीचे माजी एमडी आणि सीईओ प्रशांत जैन यांनी अँटिलियाजवळ तब्बल 45 कोटी रुपयांचा डुप्लेक्स खरेदी केला आहे. भारतातील उद्योगपतींसाठी अंबानींच्या शेजारी राहणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते, याचं हे आणखी एक उदाहरण आहे.
अँटिलियापासून ते आसपासच्या गगनचुंबी इमारतींपर्यंतचा हा संपूर्ण परिसर म्हणजे भारतातील उद्योगसम्राटांचं केंद्र. इथलं प्रत्येक घर यश, संपत्ती, कॉर्पोरेट सामर्थ्य आणि मुंबईत एकवटलेल्या अब्जावधींच्या वैभवाची वेगळी कहाणी सांगतं.