Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले


मुंबई : भारतीय शेअर बाजारात दुपारनंतर अचानक मोठी घसरण सुरु झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर करताच सेन्सेक्स आणि निफ्टी क्रॅश झाले.  निफ्टी 50 निर्देशांक 23897 अंकावर बंद झाला, तर, सेन्सेक्स 1658 अंकांनी घसरुन 76522 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये 1458 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 56742 वर बंद झाला. 

बीएसईवरील आकडेवारीनुसार आज गुंतवणूकदारांचं तब्बल 8 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 480 लाख कोटींवरुन घसरुन 472 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच जवळपास गुंतवणूकदारांचं एका दिवसात 8 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. शेअर बाजारातील प्रमुख 16 सेक्टर्स पैकी 13 सेक्टरमध्ये घसरण झाली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप 0.03 टक्क्यांनी घसरले.

भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली होती. दुपारपर्यंत निर्देशांकावर दबाव होता. बँकिंग शेअरमधील घसरणीमुळं बँक निफ्टीत घसरणीसह ट्रेडिंग सुरु होतं. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुपारी इराण सोबतची शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर करताच क्रूड ऑईलचे दर 78 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. यामुळं शेअर बाजारात घसरण झाली. 

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झाल्यानं स्मॉल कॅप, लार्ज कॅप शेअरमध्ये देखील घसरण झाली. सर्वाधिक घसरण जिओ फायनान्शिअल, श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एविएशन, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी असेटस मॅनेजमेंट, मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये घसरण झाली.  

निफ्टीच्या जवळपास सर्व निर्देशांकात घसरण झाली.  निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 1.97 टक्क्यांनी घसरला. तर, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.57 टक्क्यांनी घसरला. ऑईल अँड गॅस निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरला. शेअर बाजारात तेल विपणन कंपन्या, रंग बनवणाऱ्या कंपन्या, हवाई वाहतूक कंपन्या आणि टायर बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी संपल्याचं समोर येताच आशियाई बाजारांवर देखील दबाव पाहायला मिळाला. जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, चीनच्या बाजारात देखील घसरण झाली आहे. इंडिया विक्स निर्देशांक 15 वर पोहोचला आहे.  
  
 (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *