पुन्हा युद्धाचा भडका! अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; खामेनेईंवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच डागल्या मिसाईल | विदेश बातम्या


Last Updated:

America Attack on Iran: पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ परिसरात पुन्हा एकदा भीषण हल्ले करण्यात आले आहेत.

america attack on iran
america attack on iran

America Attack on Iran: पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ परिसरात पुन्हा एकदा भीषण हल्ले करण्यात आले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर तिथे शोकसभा आणि अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच, अमेरिकेने इराणला दोन मोठे झटके दिले आहेत. अमेरिकेने ७ जुलै रोजी इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला. याशिवाय अमेरिकेने इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचा परवानाही रद्द केला आहे.

खामेनेई यांच्यावरील अंत्यसंस्कारादरम्यान अमेरिकेचा हल्ला

इराणमध्ये सध्या ४ ते ९ जुलै दरम्यान माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानिमित्त शोक पाळला जात आहे. तेहरान, कोम आणि मशहद या शहरांमध्ये लाखो लोक या शोकसभांमध्ये सहभागी होत आहेत. ९ जुलै रोजी मशहद येथील इमाम रझा दर्ग्यात त्यांच्या दफनविधीची तयारी सुरू आहे. इराणने आधीच चेतावणी दिली होती की, या शोक काळात कोणतीही लष्करी कारवाई खपवून घेतली जाणार नाही. मात्र, या इशाऱ्याला न जुमानता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ७ जुलै २०२६ रोजी दक्षिण-पश्चिम इराणमधील केशम द्वीप, सीरिक आणि बंदर अब्बास या भागांतील अनेक ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवले.

अमेरिकेने का केली लष्करी कारवाई?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून जाणाऱ्या तीन व्यावसायिक जहाजांवर आणि तेल टँकर्सवर अज्ञात हल्ले झाले होते. या हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा संशय आहे. या व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणवर या नव्या लष्करी हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. या ताज्या घडामोडींमुळे आधीच नाजूक असलेल्या युद्धबंदीच्या प्रयत्नांना मोठा तडा गेला असून संपूर्ण पश्चिम आशियामध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे.

तेलाच्या व्यापारावर बंदी; इराणला दुसरा मोठा झटका

लष्करी कारवाईनंतर अमेरिकेने लगेचच इराणला दुसरा आर्थिक झटका दिला. अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाच्या परदेशी मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने (OFAC) ७ जुलै रोजी ‘जनरल लायसन्स एक्स’ तत्काळ प्रभावाने रद्द केलं. या विशेष परवान्यांतर्गत अमेरिकेने इराणला २१ जून २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी कच्च्या तेलाची आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची मर्यादित विक्री आणि अमेरिकन डॉलरमध्ये व्यवहार करण्याची तात्पुरती सूट दिली होती.

काय होणार परिणाम?

अमेरिकेने हा परवाना रद्द केल्यामुळे इराणच्या तेल व्यापारावर अमेरिकेचे सर्व निर्बंध पुन्हा एकदा पूर्णपणे लागू झाले आहेत. यामुळे इराणला होणारी अब्जावधी डॉलर्सची कमाई थांबणार असून, आधीच आर्थिक संकटात असलेला इराण आता पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी बातम्या/विदेश/

पुन्हा युद्धाचा भडका! अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; खामेनेईंवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच डागल्या मिसाईल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *