Nashik News : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तरुणाचा मृतदेह शोधण्याचं काम सुरु आहे. चांदवड व देवळा तालुक्यातील डोंगररांगांमधून वाहणाऱ्या चोर चावडी धबधब्यावर पोहण्यासाठी तरुण गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली.
शोधमोहीम सुरु
चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही मित्र पोहण्यासाठी गेलेले होते. यात 22 वर्षीय ऋषिकेश संसारे याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तरुणाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नसल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना, तीन जणांचा बुडून मृत्यू
जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून खदानीत सेल्फी काढताना पाय घसरून पडलेल्या तरुणाला वाचवताना आणखी दोघांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या खोल पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी पावणेपाच वाजाताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेनं संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मानव बंटी रतनानी (वय 14), कार्तिक विकी उधवानी (वय 14) आणि दिनेश विजय पंजवानी (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. तिन्ही मुले अमळनेरच्या सिंधी कॉलनीमधील रहिवासी होती.
प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळी सुमारे 4.46 वाजता खदाणीत गेली होती. खदाणीत एक बेटासारखा उंचवटा असल्याने तिघे पाण्यातून चालत त्याच्यावर चढले. इकडच्या बाजूला एक फूट पाणी होते. सेल्फी काढतांना एकाचा पाय घसरला त्याला वाचवायला दुसर्याने त्याचा हात धरला मात्र तोही खाली जाऊ लागला म्हणून त्याने तिसऱ्याचा हात धरला मात्र तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाली खदाणीजवळ पोहचला तोपर्यंत एकाने ११२ डायल केले. घटनेची माहिती मिळताच देवळी येथील व स्थानिक नागरिक आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी यु पाटील , शहर तलाठी अशपाक पिंजारी , पोलीस गणेश पाटील ,घटनास्थळी पोहचले. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.