Suryakumar Yadav Denies Fake Statement : सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक महत्त्वाचे निवेदन जारी केले आहे. या निवेदनातून त्याने टीम इंडियाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कौतुकाचे शब्दही त्याने व्यक्त केले. यासोबतच, सोशल मीडियावर त्याच्या नावाने पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही सूर्यकुमार यादवने चाहत्यांना केले. या सर्व अफवांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले. 2026 च्या टी-20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमारने चाहत्यांना केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सूर्यकुमार यादवची पोस्ट चर्चेत
सूर्यकुमार यादवने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवर आणि इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाबद्दल आपला अभिमान व्यक्त करताना, संघातील सर्व खेळाडूंना आपला कायम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्याने लिहिले, “मला भारतीय संघाचा खूप अभिमान आहे. संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी नेहमी शुभेच्छा देतो. प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना माझा कायम पाठिंबा असेल.”
वैभव सूर्यवंशीसाठी खास संदेश
या पोस्टमध्ये सूर्यकुमार यादवने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा विशेष उल्लेख केला. त्याने वैभवला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देताना लिहिले, “वैभव, तू एका अत्यंत रोमांचक प्रवासाची सुरुवात करत आहेस. प्रत्येक क्षणाचा आनंद घे, मेहनत करत राहा आणि देशाचं नाव अधिकाधिक उंचाव.” सूर्यकुमारने वैभवच्या प्रतिभेचं कौतुक करत त्याच्यावर भविष्यातील मोठा क्रिकेटपटू म्हणून विश्वास व्यक्त केला.
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) July 7, 2026
व्हायरल बनावट विधानांवर दिलं स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवच्या नावाने काही विधानं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. या पोस्टमध्ये टी-20 संघाचे नेतृत्व, कर्णधारपद आणि वैभव सूर्यवंशीबाबत त्याने कथित प्रतिक्रिया दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सूर्यकुमारने हे सर्व दावे फेटाळून लावत स्पष्ट शब्दांत म्हटलं, “माझ्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. मी असं कोणतंही विधान केलेलं नाही आणि अशा कोणत्याही मजकुराला माझी मान्यता नाही. कृपया अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे शेअर करू नका.”
भारतीय संघाला कायम पाठिंबा
सूर्यकुमार यादवने आपल्या पोस्टच्या शेवटी भारतीय क्रिकेट आणि सहकाऱ्यांप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. तो म्हणाला, “भारतीय क्रिकेट संघ, माझे सहकारी आणि या खेळाप्रती माझा आदर व पाठिंबा कायम राहील. माझ्या नावाने पसरवल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टींपेक्षा माझं काम आणि माझी कृतीच माझ्याविषयी अधिक बोलते.”
हे ही वाचा –