CM Devendra Fadnavis Netflix Series: राजकारणाच्या रणांगणात कायम व्यस्त असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. राज्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले असतानाही विरंगुळ्यासाठी ते काय पाहतात, याचा खुलासा त्यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मुख्यमंत्री म्हटलं की दिवस-रात्र काम, बैठका आणि दौरे हे समीकरण आलंच. पण या धावपळीतही थोडा वेळ स्वतःसाठी काढणं किती महत्त्वाचं आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे. प्रवासादरम्यान ते मोबाईलवर वेबसीरिज आणि संगीताचा आस्वाद घेतात.
नेटफ्लिक्सवरील ही वेबसिरिज CM ही पाहतात
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, सध्या त्यांना इंडियन आयडोल हा रिअलिटी शो पाहायला विशेष आवडतो. इतकंच नाही, तर त्यांनी या शोचे भाग डाउनलोड करून ठेवले असून प्रवासात त्यातील गाणी ऐकणं त्यांना आवडतं. याशिवाय वेबसीरिज पाहण्याचीही त्यांना आवड आहे. सध्या ते Netflix वरील लोकप्रिय The Blacklist ही सिरीज पाहत आहेत. त्यांनी ही मालिका डाउनलोड करून ठेवली असून वेळ मिळेल तशी ती पाहतात.
द ब्लॅकलिस्ट ही वेबसिरीज जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. 2013 ते 2023 या कालावधीत या मालिकेचे तब्बल 10 सीझन आणि 218 भाग प्रदर्शित झाले. या मालिकेतील ‘रेड’ हे पात्र एफबीआयला धोकादायक गुन्हेगार आणि माफियांना पकडण्यात मदत करतं. त्याच्याकडे असलेली गुप्त यादीच म्हणजे ‘ब्लॅकलिस्ट’, ज्याभोवती संपूर्ण कथानक फिरतं.
फडणवीस यांच्या कुटुंबात राजकारणासोबत मनोरंजनाचा रंग दिसतो. अमृता फडणवीस या गायिका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. अलीकडेच ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटातील एका गाण्यातही त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. यावेळी मुलगी दिविजाच्या करिअरबद्दल विचारण्यात आलं असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिविजाला वकील बनायचं आहे आणि त्यासाठी ती आतापासूनच मेहनत घेत आहे. राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर तो तिचा स्वतःचा असेल, पण त्यासाठी माझ्या नावाचा आधार नको, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.