धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू


ठाणे : मुंबईसह (Mumbai) उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस (Rain) सुरू असून काही ठिकाणी झाडे उन्मळून देखील पडले आहेत. मुंबईतील चेंबूरमध्ये एका स्कुल बसवर झाड पडन झालेल्या दुर्घटनेत 10 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मीरा-भाईंदरमध्येही अंगावर झाड (Tree) कोसळून युवकाने आपला जीव गमावल्याची माहिती आहे. राहुल अशोक पाटील असे मृत युवकाचे नाव असून दुचाकीवरुन जात असताना त्याच्या अंगावर नारळाचे झाड पडल्याने ही दुर्दैवी घडली. अपघातानंतर राहुलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. राहुल हा माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा मुलगा होता. 

भाईंदर पश्चिमेतील राई गावात बुधवारी दुपारी मुसळधार पावसादरम्यान धावत्या स्कूटीवर अचानक नारळाचे झाड कोसळल्याने एक युवक गंभीर जखमी झाला होता. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. युवक स्कूटीवरून जात असताना रस्त्यालगत उभे असलेले नारळाचे झाड अचानक त्याच्या अंगावर कोसळले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही आज त्याचा मृत्यू झाला. राय गावचे भूमिपुत्र शिलोत्री संघाचे अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष अशोक बळवंत पाटील यांचा तो मुलगा होता . 

दरम्यान, झाडपडीच्या या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पावसाळ्यात वृक्ष कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

मीरा भाईंदरमध्येही वृक्ष कोसळला

मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील गोल्ड नेस्ट परिसरात देखील मुसळधार पावसामुळे वृक्ष अचानक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली होती. वृक्ष कोसळताच परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नागरिकांनी वेळेवर सतर्कता बाळगल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच श्री सिद्धिविनायक सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक थांबवून नागरिकांना सुरक्षित अंतरावर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. पावसाळ्यात अशा घटना वाढत असल्याने नागरिकांनी खराब हवामानात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाईंदर (पश्चिम) राई गाव येथे निष्काळजीपणामुळे झालेल्या तरुण दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 अन्वये संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे. तरुण दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायक असून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाची आहे. संबंधित ठेकेदार, देखभाल संस्था किंवा जबाबदार व्यक्ती यांनी धोकादायक अवस्थेतील झाडाची योग्यवेळी पाहणी, छाटणी किंवा आवश्यक सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत आहे, तर त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे मानून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 अन्वये संबंधित जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, असे मागणी मीरा भाईंदर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केली आहे. 

प्रत्यक्षदर्शी स्वप्नाली म्हात्रेंची प्रतिक्रिया

राई येथे नारळाचे झाड अंगावर कोसळून तरुण राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी स्वप्नाली म्हात्रे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुण राहुल पाटील हे दुचाकीवरून रस्त्याने जात असताना अचानक मातीचा आधार निसटलेल्या नारळाच्या झाडाचे संतुलन बिघडले आणि ते थेट त्यांच्या अंगावर कोसळले. झाड कोसळताच दुचाकी आणि तरुण दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात तरुण राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात धोकादायक अवस्थेतील झाडांची वेळेत पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *