कोण होत्या विजया मेहता? ज्यांनी विजय तेंडुलकरांपासून नाना पाटेकरांपर्यंत अनेकांना दिलं व्यासपीठ – Marathi News | Who was Vijaya Mehta Veteran theatre icon who mentored Nana Patekar and others


ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्या असलेल्या विजया मेहता यांच्या जाण्याने विचार समृद्ध अशा सोनेरी इतिहासाचं पर्व लयाला गेलं आहे. बडोदा इथल्या सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या विजू जयवंत यांचा विजया खोटे आणि विजया मेहता असा झालेला प्रवास हा जितका व्यापक आहे, तितकाच तो बहुपेडी असा होता. नाट्यक्षेत्रात ‘बाई’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी दत्तात्रेय आणि भुराबाई या दाम्पत्यापोटी बडोदा इथं झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय जयवंत हे थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये कार्यरत होते. विजय यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यप्रशिक्षक इब्राहिम अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडून नाट्यप्रशिक्षण घेतलं. त्यापूर्वी त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेतून अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती.

विजया मेहता यांचा विवाह अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी झाला. त्यांना रवी आणि देवेन ही दोन मुलं आहेत. हरीन खोटे यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी फारोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांना अनाहिता ही मुलगी आहे. मराठी रंगभूमीवर त्यांनी प्रायोगिक रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांनी फक्त आशयघन नाट्यकृती प्रेक्षकांना दिल्या नाहीत तर अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक त्यांच्या तालमीत तयार झाले. त्यांनी श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत मिळून रंगायन ही चळवळ सुरू केली. हमीदाबाईंची कोठी हे त्यांचं गाजलेलं नाटक. मला उत्तर हवंय, एका घरात होती, संध्याछाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष, वाडा चिरेबंदी अशी अनेक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आणि त्यांतून कामही केलं. 1960 च्या दशकातील मराठी रंगभूमीच्या त्या चेहरा होत्या.

विजया मेहता यांनी नाना पाटेकर, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, नीना कुळकर्णी, विक्रम गोखले, मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि प्रतिमा कुलकर्णी यांसारख्या कलाकारांना तयार केलं. विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजून घ्यावं हे इथे किमान त्यांनी दोन पिढ्यांमध्ये रुजवलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *