सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी


मुंबई : विधानपरिषद उपसभापतीपदी आमदार सचिन अहिर (Sachin ahir) यांची सर्वानुमते निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर, आता सभागृहातील इतर नेत्यांकडूनही त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, सचिन अहिर यांचे अभिनंदन करताना दोन्ही शिवसेना पक्षातील दोन्ही नेत्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी नीलम गोऱ्हेंना नाव न घेता टोला लगावला, तर नीलम गोऱ्हेंनी (Neelam gorhe) देखील अनिल परब यांचे नाव घेऊन टोमणा मारल्याचं दिसून आलं. 

विधानपरिषदेत दोन्ही शिवसेना आमदारांची जुगलबंदी पाहायला मिळाली, नीलम गोऱ्हे यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन करताना म्हटले की, मी स्वतः सभापती आणि उपसभापती म्हणून दीड वर्ष काम करत होते. माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, विशेषतः अनिल परब यांनी टीका केली, पण आता केली नाही, ठीक आहे तुमची भूमिका तुम्ही व्यवस्थित पार पडता, असे म्हणत अनिल परब यांच्या भूमिकेवरुन त्यांनी टोला लगावला. तसेच, मी एकदा बोलले होते की मातोश्रीचं मन राखण सोपं नसतं, त्यावरून गोंधळ झाला होता, अशी आठवणही नीलम गोऱ्हेंनी सांगितली. सभागृहात आल्यानंतर उजवीकडे बघायचं की डावीकडे हा प्रश्न होता, त्यावेळी मी समोरं बघायचे. कधी तर उद्धवजी आणि एकनाथ शिंदे दोघे एकत्र असायचे, तेव्हा कुठे बघायचं? कधी समोरं बघायचे तर कधी दोघांकडे बघायचे, मी कोणावर अन्याय करत नव्हते, असेही गोऱ्हेंनी म्हटले. 

सभागृहात एक दूत बसलेला आहे, तो दूत सगळीकडे असतो, त्याचा काही प्रमाणात फायदा होतो, कधी तोटा होतो. काही न सांगता देखील त्यांनी तोडगे काढलेले आहेत, असे म्हणत मिलिंद नार्वेकरांना देखील नीलम गोऱ्हेंनी शुभेच्छा दिल्या. तसेच, विधिमंडळात काही कार्यक्रम होतात त्याची माहिती सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, जयंती कार्यक्रम होतात त्याची माहिती आम्हाला माहिती मिळत नाही. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते की, माझ्याकडून काही अन्याय झाला असेल, विशेषतः मागच्या बाकावर असलेल्या सदस्यांबद्दल बोलत असल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं. 

अनिल परबांचा नीलम गोऱ्हेंना टोला

सचिन अहिरांचा सर्व क्षेत्रात चांगला वावर आहे, माझा चांगला साथीदार राजकीय निर्णय घेत असल्याने थोडं दु:ख होतंय. आता ते उपसभापती झाले आहेत, त्यामुळे आता ते कुठल्याही पक्षाचे नाहीत. सत्तेचा माज असू नये आणि अल्पमताचा न्यूनगंड असू नये, सचिन अहिरांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत, असे अनिल परब यांनी म्हटले. तर, सचिन अहिरांचा बुलडोझर असा चालला की अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, बुलडोझर कसा आला हेही कळले नाही, असे म्हणत अनिल परबांनी नाव न घेता नीलम गोऱ्हेंना टोला लगावला. 

हेही वाचा

खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *