१२०० रुपयांच्या चांदीच्या अंगठीसाठी सरकारी नोकरी गमावली, कुडाळ नगरपंचायतीच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला अटक – Marathi News | Anti Corruption Bureau arrests corrupt employee of Kudal Nagar Panchayat.


नव्या धंदा सुरु करण्यासाठी एनओसी देण्याच्या मोबदल्यात १२०० रुपये किंमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला अँण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. मात्र, स्वच्छता निरीक्षकाला संशय आल्याने त्याने अंगठी नष्ट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले.

कुडाळ नगरपंचायतीमध्ये व्यवसायासाठी ना हरकत परवाना मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १२०० रुपये किमतीची खड्यासह चांदीची अंगठी मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत नाटेकर यांनी तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कारवाईपूर्वी संशय आल्याने त्यांनी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.

तक्रारदाराला कुडाळ येथे “पदमगड ज्वेलर्स” नावाची पेढी काढायची होती. त्यासाठी त्याने नगरपंचायतीकडे एनओसी मागितली होती. हा परवाना मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. हा दाखला मंजूर करुन देण्याच्या बदल्यात स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी खडा असलेली चांदीची अंगठी लाच म्हणून मागितली होती. या अंगठीची किंमत केवळ १२०० रुपये होती. मात्र,तक्रारदाराने लाच न देता या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर एससीबीच्या पथकाने आज कुडाळ नगरपरिषदेत सापळा रचला होता. लाचेची अंगठी तक्रारदाराकडून स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नाटेकर यांना तब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी अंगठी लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगठीला अँथ्रोसिन पावडर लावली होती. ती पावडर त्यांच्या हाताला असल्याने लाचलुचपत पथकाने त्यांना अटक केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *