शिंदेंमुळेच राज्यात महायुतीची सत्ता, शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या विधानांची चर्चा – Marathi News | Sena Leaders Credit Eknath Shindes Schemes for Mahayuti Success, Demand CM Role


एकनाथ शिंदे यांनी चांगल्या योजना आणल्या. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली, असं विधान शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन नेत्यांनी केलं आहे. शिवसेना नेते शहाजी बापू पाटील आणि रवींद्र धंगेकर यांनी ही विधाने करून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही आम्ही आशावादी आहोत, असं म्हटलंय. भाजपमधून या विधानावर कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप नेते यावर काय भाष्य करतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

शहाजी बापू पाटील यांनी दिल्लीत भाषण करताना हे विधान केलं आहे. खुर्च्या येतात आणि जातात. खुर्चीवर बसल्यावर अनेक माणसं मोठी होत असतात. त्या खुर्चीवर बसल्यावर त्या खुर्चीचं महत्त्व वाढवलं ते एकनाथ शिंदे यांनी. एकनाथ शिंदे यांनी खासदारकीची निवडणूक झाल्यावर जर कामाची गती वाढवली नसती तर राज्यात महायुतीची सत्ता आली नसती, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर…

एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण आणि इतर योजना आणल्या आणि राज्यात महायुतीची सत्ता आणली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर डोळे झाकून, मान टाकून ज्याच्यावर विश्वास ठेवावं असं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर तलवारीला मुंडक (डोकं) लावायला तयार आहे, असं मी महेश शिंदे यांना म्हटलं, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं. तसेच चंद्रहार पाटील यांना राजकीय पद देऊन महाराष्ट्रात फिरवलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

परत मुख्यमंत्री व्हावेत

शहाजी बापू पाटील यांच्या पाठोपाठ शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीमध्ये कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता आली. सर्वजण एकत्रित लढल्यामुळे त्याचं श्रेय कॅप्टनला जातं. भविष्यात महाराष्ट्राला चांगला चेहरा पाहिजे. एकनाथ शिंदे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतात. सामान्यांना न्याय देतात. धाडसी निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

आम्ही आशावादी

शहाजी बापू पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्या विधानावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आणि आमदाराला वाटत की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. यात कोणाचे दुमत नाही. मला देखील वाटत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे. सगळ्या गोष्टींचे वातावरण पाहिल्यानंतर या गोष्टी ठरत असतात. याबद्दल पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व आशावादी आहोत, असं गुलाबराव पाटील म्हटलंय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *