शायना एनसी असू, नाहीतर कोणीही…; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया


मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानजनक उल्लेख केल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेना प्रवक्त्यांनी आज त्या पुस्तकातील दोन पानं फाडली. मात्र, याचवेळी, उद्धव ठाकरेंना ते पुस्तक भेट देत असल्याचाही फोटो फाडण्यात आला. त्यासोबतच, शिवसेनेच्या (Shivsena) शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब आणि मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडण्यात आला. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. बाळासाहेबांचा फोटो फाडल्यामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही तातडीने दखल घेत शायना एनसी यांना बोलावून घेतले होते. आता, याप्रकरणी त्यांनी भूमिका मांडली, तसेच बाळासाहेबांचा फोटो फाडला नसल्याचंही त्यांनी म्हटलं. 

सोनिया गांधी यांच्या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला आहे, त्यामुळे या पुस्तकाचा निषेध करावा तेवढा कमी आहे. राहुल गांधी यांनी देखील सावरकरांचा अपमान केला, जाणीवपूर्वक अपमान केला आहे. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जे स्वत:ला हिंदुत्त्ववादी म्हणतात ते कसं काय करू शकतात. त्या पुस्तकातील दोन पानं स्वातंत्र्यवीर सावकराच्या विरोधातील आहेत, त्याबद्दल हे ब्र काढत नाहीत, त्याचा निषेध करत नाही. याउलट त्यांच्या गळ्यात गळे घालून बसतात, याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रवक्त्यांनी पुस्तक फाडल्याचं समर्थन करत नाव न घेता उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.  

स्वातंत्रवीर सावरकर यांनी या देशासाठी जे केलं ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे, त्यांचा अपमान करणं ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का, सावरकर यांचा अपमान तुम्ही वारंवार करणार ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. जनतेनं या लोकांना तीनवेळा रिजेक्ट केले, बाळासाहेब यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, असेही शिंदेंनी म्हटले. 

बाळासाहेब आमचे दैवत आहेत, कोणीही शिवसैनिक बाळासाहेबांचा अपमान करू शकत नाही. शायना एनसी यांनी फोटो फाडल्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. त्यात बाळासाहेब हे मणीशंकर अय्यरला जोडे मारतानाचा फोटो आहे. शायना यांनी मणीशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे, त्याचं तोंड फाडलेलं आहे, हे मला शायना एनसी यांनी दाखवलं. बाळासाहेबांचा अपमान शायना एनसी असू द्या नाहीतर कोणीही शिवसैनिक कदापी करू शकणार नाहीत. कारण, बाळासाहेब आमचं दैवत आहे, त्यांचे विचारच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळेच, जनतेने आम्हाला स्वीकारले आहे, आम्ही त्यांची विचारधारा घेऊन पुढे  चाललो आहे. मात्र, खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचे हे काम करत आहेत. आता, त्यांच्याकडे काही नाही. लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे, असे म्हणत नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. तसेच, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला पाहिजे, असा सल्लाही ठाकरेंच्या शिवसेनेला दिला. 

हेही वाचा

सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला ‘दे धक्का’; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *