भारतातील 50 वर्षे जुन्या सुप्रसिद्ध सिरियलची चक्क पाकिस्तानमध्ये होती तुफान लोकप्रियता, एपिसोड पाहण्यासाठी लोक थेट… – Marathi News | Buniyaad Serial Before Ramayan Mahabharat Ruled Viewers Hearts


1980 च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिका दूरदर्शनवर येण्यापूर्वीच एका मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. 1986 मध्ये प्रसारित झालेली ‘बुनियाद’ भारतासोबतच पाकिस्तानातही प्रचंड लोकप्रिय झाली. ही मालिका पाहण्यासाठी लोक आपली कामे लवकर आटोपून घरी पोहोचत असत. लाहोरमधील रस्तेही मालिकेच्या प्रसारणावेळी ओस पडायचे, असे सांगितले जाते. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडले होते.

‘बुनियाद’ची कथा लाहोरमधील शिक्षक मास्टर हवेलीराम खन्ना आणि त्यांची पत्नी लाजवंती (लाज्जो) यांच्या जीवनाभोवती फिरते. फाळणीपूर्वी सुखी असलेल्या या कुटुंबाला विभाजनानंतर दिल्लीला स्थलांतर करावे लागते. त्यानंतर विस्थापनाचे दुःख, कुटुंबाचा संघर्ष आणि नव्याने आयुष्य उभे करण्याचा प्रयत्न मालिकेत दाखवण्यात आला आहे. एकूण 105 भागांच्या या मालिकेतील अनेक पात्रे घराघरात लोकप्रिय झाली होती.

‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि ज्योती स्वरूप यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले होते. मनोहर श्याम जोशी यांनी कथा लिहिली होती. आलोक नाथ, सोनी राजदान, सुधीर पांडे, पल्लवी जोशी, दिलीप ताहिल, मजहर खान आणि राजेश पुरी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मजहर खान यांनी सांगितले होते की, महिला रेड लाइटवर गाडी थांबवून त्यांचे कौतुक करायच्या. आलोक नाथ यांना प्रेक्षकांकडून सल्ला मागणारी पत्रे मिळायची, तर सोनी राजदान यांना नकारात्मक भूमिकेमुळे नाराजीचा सामना करावा लागला.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी लाहोरमध्ये ‘बुनियाद’च्या प्रसारणावेळी कर्फ्यूसारखे वातावरण निर्माण व्हायचे. परदेशातही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग होता. लोकप्रियतेमुळे 2006 मध्ये सहारा वनवर आणि 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनवर तिचे पुनर्प्रसारण झाले. आजही ‘बुनियाद’ फाळणीच्या आठवणी आणि संघर्ष जिवंत करणारी मालिका म्हणून स्मरणात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *