पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या आवळ्यापासून बनवा 4 आरोग्यदायी पेयं, दिवसाची सुरूवात करा उत्साहाने – Marathi News | Make 4 healthy drinks from nutrient rich amla and start your day with energy


सकाळची सुरुवात एका आरोग्यदायी आणि फ्रेश पेयाने केल्यास तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. यासाठी आवळा हे एक फळ आहे, ज्याचा तुमच्या आहारात अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. कारण यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखी पोषक तत्वे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्यापासून बनवलेल्या पेयांचाही तुमच्या आहारात समावेश केला जाऊ शकतो. मात्र ते बनवताना त्यात जास्त साखर टाकणे टाळा आणि ते खूप थंड पिणेही टाळा.

आवळ्यापासून विविध प्रकारची ताजेतवाने करणारी पेयं सहजपणे काही वेळातच घरी बनवता येतात. या पेयांचा आस्वाद दिवसाची सुरुवात म्हणून किंवा नाश्त्यासोबत घेता येतो. चला तर मग घरी सहजपणे बनवता येणाऱ्या काही आरोग्यदायी आणि ताजेतवाने आवळ्याच्या पेयांबद्दल आणि ती बनवताना कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात.

आवळ्यापासून ही 4 आरोग्यदायी पेये बनवा

आवळा-पुदिन्याचे पेय

2 ते 3 आवळे मूठभर पुदिना आणि थोडे पाणी एकत्र वाटून घ्या. आता हे पाणी गाळून घ्या आणि चवीनुसार लिंबाचा रस व थोडे भाजलेले जिरे यात मिक्स करा. गरज वाटल्यास थोडे मध देखील या पेयांमध्ये मिक्स करा. आवळ्यामुळे व्हिटॅमिन सी मिळते आणि पुदिन्यामुळे ताजेतवाने करणारा सुगंध येतो. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकते. हे नाश्त्यासोबत सेवन केले जाऊ शकते.

आवळा-कोरफड पेय

एका ग्लास पाण्यात 1 ते 2 आवळ्याचे तुकडे आणि 1 चमचा शुद्ध कोरफडीचा गर मिक्स करा. चवीसाठी थोडे लिंबाचा रस आणि पुदिना टाका. चांगले मिसळून ताजे प्या. आवळ्यातून व्हिटॅमिन सी मिळते आणि कोरफडीतून आवश्यक पोषक तत्वे मिळतात. हे पेय शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. कोरफडीच्या गराचा अतिवापर टाळा.

आवळा-काकडी पेय

एक आवळा आणि अर्धी काकडी चिरून घ्या आणि पाण्यात घालून वाटून घ्या. त्यात थोडा पुदिना आणि भाजलेले जिरे टाका आणि पुन्हा वाटून घ्या. आता हे सरबत गाळून प्या. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर आवळ्यातून व्हिटॅमिन सी मिळते. हे पेय उष्ण हवामानात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करू शकते.

आवळा-आले पेय

एका ग्लास पाण्यात 2 आवळे आणि आल्याचा एक लहान तुकडा टाकून मिश्रण वाटून घ्या आणि गाळून घ्या. आता या पेयामध्ये चवीनुसार थोडे लिंबाचा रस व मध टाका. आता हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून प्या. आवळ्यातून व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, तर आल्यातून नैसर्गिक घटक मिळतात. आल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते.

आवळ्याचे पेय बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

आवळ्याचे पेय बनवताना ताजे आणि स्वच्छ धुतलेले आवळे वापरा. ​​आवळा कापण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवा. पेयामध्ये जास्त साखर किंवा गोड पाक मिक्स करू नका. चव आंबट लागल्यास त्यात थोडे मध किंवा दुसरे गोड फळ तुम्ही टाकू शकता. आवळा जास्त काळ ठेवण्याऐवजी ताजे पेयं बनवा आणि प्या.

तुम्हाला जर आंबट पदार्थांमुळे छातीत जळजळ किंवा आम्लपित्ताचा त्रास होत असेल, तर आवळ्याचे सेवन मर्यादित करा. जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही औषधे घेत असाल तर तुमच्या आहारात आवळ्याच्या पेयांचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *