Last Updated:
Pune SP Sandip Singh Gill Visit Lohgad: लोणावळ्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणातील चौकशी आणि घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी लोहगड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तपास पथकाकडून आतापर्यंतच्या चौकशीचा आढावा घेत घटनास्थळाची सखोल पाहणी केली.
अंनिस शेख, प्रतिनिधी, मावळ (पुणे) : लोणावळ्यातील चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू असून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला. लोहगड परिसरात जाऊन त्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या.
केतन अग्रवालच्या मृत्यूमागील नेमके कारण, घटनाक्रम आणि आरोपींची भूमिका याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एसपी संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देत उपलब्ध पुरावे, तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील प्रगती याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
सिया पुरती अडकणार, एकही पुरावा नजरेआड होऊ नये यासाठी पोलिसांना सूचना
यावेळी त्यांनी घटनास्थळावरील प्रत्येक बाब बारकाईने तपासण्याचे निर्देश दिले. घटनास्थळी आढळून आलेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक बाबींची सखोल छाननी करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिल्या. तपासात कोणतीही माहिती दुर्लक्षित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, घटनाक्रमाचा बारकाईने अभ्यास
या प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्या आधारे चौकशीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. खून होण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी, डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण आणि घटनास्थळाशी संबंधित सर्व माहिती एकत्रित करून तपास पुढे नेला जात आहे.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिल्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पोलिस यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून लवकरच या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड नेमके काय आहे?
पुण्यात बडे उद्योजक कुटुंब असलेल्या विशाल अग्रवाल यांचा लेक केतन अग्रवाल याचे सिया गोयल हिच्याशी लग्न ठरले होते. मात्र हे लग्न सियाला मान्य नव्हते. तिचे दुसऱ्या एका उद्योजक मुलावर प्रेम होते. त्यामुळे आपल्या प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी तिने केतन अग्रवाल याचा काटा काढण्याचे ठरवले. या कामासाठी तिने आपला बॉयफ्रेंड चेतन चौधरी याची मदत घेण्याचे ठरवले. केतनची हत्या करण्यासाठी चेतन आणि सियाने तीन वेळा प्लॅन केला, त्यातील दोन वेळा हा प्लॅन फसला. तिसऱ्यांदा मात्र निष्पाप केतनला जीवाला मुकावे लागले. पुण्यातील लोहगडावरून ढकलून देऊन सिया आणि चेतने याने केतन अग्रवाल याचा जिवंत मारले. १८ जून रोजी ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर नेऊन केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप दोघांवर आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करीत आहेत.
Pune,Maharashtra
Jun 24, 2026 10:08 PM IST
केतन खून प्रकरणात सिया पुरती अडकणार, SP संदीप सिंह गिल ‘ऑन द स्पॉट’ लोहगडावर, तपासी अधिकाऱ्यांना कडक सूचना
