कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई


जळगाव : यंदा आपल्या नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळा (Kumbhmela) कामाच्या संदर्भात बनावट वर्क ऑर्डर काढून काही जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्या नात्यातील तनय महाजन याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तनय महाजन याच्या अटकेनंतर तनयचे वडील अनंत महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. तर, गिरीश महाजन यांनीही तनय हा माझा दूरचा नातेवाईक असून त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याचं म्हटलं. तसेच, या प्रकरणात नातेवाईक असो किंवा इतर कोणी, कोणाचीही हयगय केली जाणार नाही, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे गिरीश महाजन (Girish mahajan) यांनी  स्पष्ट केले.

कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष यांच्या बनावट सहीने तब्बल 70 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळा संदर्भात कामांची वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी अज्ञाताने कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही वापरून गैरप्रकार केला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी हा मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली असून गिरीश महाजन यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कुंभमेळ्यातील काम मिळवून देण्याच्या, बनावट वर्क ऑर्डर देण्याचा घोटाळा समोर आला असून या प्रकरणात जामनेरमधील दोन जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून इतरही आणखी पाच ते सात आरोपी या गुन्ह्यामध्ये त्यांचाही शोध सुरू आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. तसेच, अटकेतील एक आरोपी तनय महाजन हा माझा फार दूरवरचा नातेवाईक आहे, वाया गेलेला आहे, त्याच्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. हा फार गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे नातेवाईक असो की इतर कोणीही असो कुणालाही सोडायचं नाही. जे जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई केली जाईल, अशा शब्दात कुंभमेळ्या कामांच्या टेंडर घोटाळ्याबाबत गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 

तनयपेक्षाही काही मोठे नावं समोर येतातंय – महाजन

याच प्रकारचा नाही तर इतरही प्रकरणांमध्ये अशाच पद्धतीच्या बनावट वर्क ऑर्डर तयार होऊ शकतात. त्यामुळे ही फसवणूक असून यात कुणाचीही हयगय काय केली जाणार नाही? मी स्वतःच या प्रकरणात तक्रार केली आहे, त्यामुळे कुणालाही यातून सोडले जाणार नाही. तनय महाजन हा या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा सांगितलं जात असलं तरी यात आणखी काही मोठे नावं आहेत की त्यांनी यात मोठ्या रकमा घेतल्याची माहिती समोर येते आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. 

आरोपी तयनच्या वडिलांची प्रतिक्रिया

तनयला पोलिसांनी अटक केल्याचं आपल्याला, गावातील लोकांनी सांगितलं. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनीही तनयच्या कृत्यबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त करून राग व्यक्त केला आहे. तनयला कोणत्या प्रकारात अटक केली किंवा काय आपल्याला माहित नाही, तो शहरात हार्डवेअरचे दुकान चालवत होता. मात्र, गेल्या वर्ष भरापासून तो दुकानात बसत नसल्याने ते बंद करावे लागले होते. या सगळ्या प्रकारात आपल्याला खूप दुःख आणि मनस्ताप होत आहे. या घटनेमुळे समाजात बदनामी सहन करावी लागत असल्याचं अनंत महाजन यांनी म्हटलं. तसेच, तनय कोणाची फसवणूक करेल असे आपल्याला वाटत नाही. मात्र, त्याने असे केले असेल तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया तनयच्या वडिलांनी दिली.

हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *