नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला विविध नियमांमध्ये बदल होत असतात. त्याच प्रमाणं यावेळी 1 जुलै 2026 पासून आर्थिक गोष्टींशी संबंधित नियमात बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम करदाते, बँक ग्राहक, क्रेडिट कार्ड यूजर्स, पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांवर होणार आहे. पासपोर्ट शुल्कात देखील वाढ करण्यात आली आहे. तर, बँकांकडून ग्राहकांना विविध सेवांची विक्री चुकीच्या पद्धतीनं केली जाते त्यावर आरबीआयकडून कारवाई केली जाऊ शकते.
आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट करण्याची सुविधा
येत्या 1 जुलैपासून UIDAI च्या एप्लिकेशनमध्ये आधार कार्ड डेटामध्ये नोंदणीकृत ईमेल आयडी अपडेट करणं आता मोफत करण्यात आलं आहे. यासाठी लागणारं 75 रुपयांचं शुल्क माफ करण्यात आलं आहे. ही सुविधा पुढील सहा महिन्यांच्या कालावाधीसाठी मोफत असेल. 31 डिसेबर 2026 पूर्वीपर्यंत सुविधा मोफत असेल.
क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट
स्टेट बँक क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 1 जुलैपासून धक्का बसणार आहे. एसबीआय कार्डकडून त्यांच्या Phonepe SBI Credit Cards सारख्या PURPLE आणि SELECT BLACK साठी रिवॉर्ड पॉइंटस प्रोग्रॅमध्ये बदल केला जाणार आहे. रिवॉर्ड पॉइंटस अर्निंगवर मर्यादा निश्चित केली जाऊ शकते.
एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड धारकांना आता प्रत्येक तिमाहीत केवळ 3 मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज सुविधा मिळेल. मात्र, त्यांनी मागील तिमाहीत क्रेडिट कार्डवरुन 60 हजार रुपये खर्च केलेले असावेत.
पासपोर्ट शुल्क वाढलं
तुम्ही जर पासपोर्टसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.विदेश मंत्रालयाकडून पासपोर्ट शुल्कात वाढ करण्यात आली आहे. 36 पानांच्या पासपोर्टचं शुल्क 1500 रुपयांवरुन 2500 रुपये करण्यात आलं आहे. तर, तात्काळ पासपोर्टसाठी शुल्क 5000 रुपये करण्यात आले आहेत. याशिवाय 60 पानांच्या पासपोर्टचं शुल्क 6 हजार रुपये करण्यात आलं आहे.
मिस सेलिंगवर पूर्ण परतावा मिळणार
बँकांकडून ग्राहकांच्या हितांच्या संरक्षणासाठी 1 जुलै 2026 पासून रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्टनुसार नवी संरचना लागू केली जात आहे. प्रामुख्यानं बँकेचे कर्मचारी किंवा एजंट ग्राहकांना न सांगता किंवा फसवून विमा पॉलिसी किंवा इतर आर्थिक उत्पादनं विकू शकणार नाहीत. नव्या नियमानुसार मिस सेलिंग सिद्ध झालं तर बँकेला ग्राहकांना पूर्ण पैसे आणि नुकसानासाठी भरपाई देखील द्यावी लागेल.
आयटीआर फायलिंगची मुदत कधीपर्यंत?
आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयटीआर-1 आणि आयटीआर -2 फाईल करण्याची मुदत जवळ आली आहे. आयटीआर फाईल करण्यासाठीची मुदत 31 जुलै 2026 पर्यंत आहे. तुम्ही जर या मुदतीत आयटीआर फाईल करु शकला नाहीत तर दंड भरावा लागेल. याशिवाय विलंब शुल्क देखील भरावं लागेल. त्यामुळं 31 जुलैपूर्वी आयटीआर फाईल करावा.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!