लॉर्डस : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचे महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. रविवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या करो या मरोच्या महामुकाबल्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवासोबतच भारतीय संघाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास इथेच संपला असून संघ अधिकृतपणे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारतीय संघ यंदा इतिहास रचेल अशी भारतीय चाहत्यांना मोठी अपेक्षा होती, परंतु ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा मोठ्या सामन्यांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत भारताला स्पर्धेतून पॅक-अप करण्यास भाग पाडले.
ऑस्ट्रेलियानं भारताला 6 विकेटनं पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या पराभवासह भारताचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. हर्मनप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं 4 विकेटवर 170 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं 19 व्या ओव्हरमध्येच मॅच जिंकली. त्यांनी 19 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 172 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरी आणि एश्ले गार्डनर या दोघींनी अर्धशतकं केली. ऑस्ट्रेलियाला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला होता. यानंतर श्री टरणीनं फीबी लिचफील्डला बाद केलं, लिचफील्डनं 24 धावा केल्या. बेथ मूनी 22 धावा करुन बाद झाली. एलिस पेरीनं 56 धावा केल्या, तर, एश्ले गार्डनर हिनं 53 धावा केल्या.
भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 170 धावा केल्या. भारतासाठी हरमनप्रीत कौर हिनं 56 धावा केल्या. कौरनं 6 चौकार आणि तीन षटकार मारले. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. शफाली वर्मान 34 धावा करुन बाद झाली. तर, जेमिमा रॉड्रिग्ज 34 धावा करुन रिटायर्ड हर्ट झाली. तर, स्मृती मानधना 38 धावा करुन धावबाद झाली.
दरम्यान, वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या संघाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये मात्र उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. या पराभवामुळं टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान संपलं. आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना अपेक्षेप्रमाणं कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीनं अनुभव पणाला लावत फलंदाजी केली आणि संघाला विजयाजवळ पोहोचवलं. आता ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध सामना होणार आहे. भारत स्पर्धेतून बाहेर झाला असताना त्यांच्या गटातून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दुसरीकडे भारताचं टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिलं आहे.
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला