मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं


मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं

चार माणसं घरात असली की कुरबुरी होतात, छोटेमोठे वाद, भांडणं होतच राहतात, भांड्याला भांड लागतंच. मात्र ते वाद कुठे थांबवायचे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे, एकदा का भान हरवलं, माणूस बेभान झाला की मग रागाच्या भरात तो काय करून बसेल याची काहीही खात्री नाही. आई-वडील हे मुलांच्या डोक्यावरचं छत्र मानलं जातात, आपल्या मुलांना काही होऊ नये म्हणून आई-वीडल ढाल बनून उभे असतात. पण एखादा पिताच जर आपल्या मुलांच्या जीवावर उठला तर ? असाच काहीसा भयानक प्रकार घडला तो अमरावतीमध्ये.. जिथे एका माणसाने त्याच्याच सख्ख्या मुलावर आणि सुनेच्या अंगावर घाडी घालत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अमरावतीच्या तिवसामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी सून आणि मुलाने आपल्या वडिलांविरोधात तक्रार केली.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक आणि थरारक घटना तिवसा येथे घडली. कौटुंबिक वादातून सख्ख्या बापानेच आपल्या मुलाला आणि सुनेला जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांच्या अंगावर भरधाव गाडी घातली आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अश्विनी खान आणि आझाद खान अशी पती पत्नीची नावं असून त्यांनी जमा खान यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

खान कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू होता, त्याचाच राग जमा खान यांच्या मनात होता. घटनेच्या दिवशी अश्विनी आणि तिचे पती आझाद हे हॉटेलमध्ये होते. तेवढ्यात जमा खान तिथे आले आणि हॉटेल समोर उभी असलेली चारचाकी गाडी त्यांनी सुरू केली आणि भरधाव वेगाने जात त्यांनी ही कार मुलगा आणि सुनेच्या अंगावर घालत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला असं समजतं. या घटनेत हॉटेल आणि कंपाउंडचे मोठं नुकसान झालं आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

जमा खान यांच्या हल्ल्यात त्यांची सून अश्विनी यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. तसेच मुलालाही थोडं लागलं. यानंतर अश्विनी आणि आझाद यांनी पोलिसांत तातडीने धाव घेतली आणि जमा खान यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे वडिलांनी देखील मुलगा आझाद खान याच्याविरुद्ध तक्रार दाखल करत आपल्याला शिवीगाळ करून दगड मारले अशी तक्रार दिली. मात्र घरगुती, कौटुंबिक वादातून वडिलांनी आपल्याच मुलाला आणि सुनेला कारने चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *