संभाजीनगर : राज्यातील रस्ते अपघाताच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. गेल्याच आठवड्यात सोलापुरात देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघाता झाल्याची घटना घडली होती. वाहन विहिरीत पडून झालेल्या या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता, छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) देखील अपघाताची घटना घडली असून पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर हा भीषण अपघात झाला. दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथून आठवडी बाजार करून खंडाळा येथील पारधी वस्तीकडे परतणारे चव्हाण कुटुंब दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन महिला, एक पुरुष आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?