Video: एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार, ओमराजेंची घोषणा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन, ठाकरेंबद्दलही बोलले


धाराशिव : एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) साहेबांच्या नेतृत्वात काम करणार, शिवसेना पक्षात प्रवेश करतोय, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलताना केली. धाराशिवमधील गोवर्धन वाडीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले, त्यानंतर बोलताना ओमराजेंनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. वडिल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाच्या निकालावर भाष्य केल्यानंतर राजकीय दवाबामुळे, सत्तेमुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, मतदारसंघातील लोकांची कामे होत नसल्याचे ओमराजेंनी म्हटलं. 

मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोकांना भेटलो, गेले 4 तास बैठका सुरू होत्या, मी सर्वाचे मत जाणून घेतले. सगळ्याच्या कार्यकर्त्यांच्या मला सूचना आहेत, मला थोडी पार्श्वभूमी सांगायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या निवडणूक लढत असताना आम्हाला यश मिळाले नाही. सामान्य नागरिकांना वेळ दिला प्रश्न सोडवले, आम्ही कामात कधी पडलो नाही? सत्तेमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असे म्हणत आपली खंत ओमराजेंनी बोलून दाखवली. 

ठाकरेंबद्दल कृतज्ञता

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्यजी यांचा स्नेह मला कायम लाभला. मला त्यांच्याबद्दल आजही आदर आहे, त्यांच्याबद्दल समोरुन काहीही टीका करण्यात आली, काहीही बोलण्यात आले तरी माझ्याकडून कधीच एकही शब्द उलट जाणार नाही, मी त्यांचेही आभार मानतो, असे म्हणत ठाकरे कुटुंबीयांप्रती ओमराजेंनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, यापुढे माझा राजकीय प्रवास सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी सुरू राहिल, असेही ओमराजेंनी म्हटले. 

मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंचा फोन आला

पवनराजे निंबाळकर खटल्यात राजकीय वैमनस्य होते हे कोर्टाने मान्य केले जाते, पण निकाल आला तो दुर्दैवी. निकालाचं दुःख आम्हाला सहन करावे लागले, एक माणूस आमच्या पाठीशी उभा होता. कोर्ट निकाल लागला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले, तिथेही आम्हाला हायकोर्टात न्याय मिळावा म्हणून आम्ही सागितले, अशी माहिती ओमराजेंनी दिली.

राणा जगजीतसिंह पाटलांना विरोध कायम

आता महायुतीमधील शिवसेना पक्षात आलो असलो तरीही नीच प्रवृत्तीच्या लोकांचा विरोध कायम राहिल, असे म्हणत राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी आपला राजकीय विरोध कायम राहिल, असेही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

बोलण्यापेक्षा मी घेतलेला निर्णय कामातून दाखवेन

कुठलाही पक्ष असला तरी विरोध कायम असेल, सत्तेची ताकद घेऊन काम करू, अनेक कामं आज होत नाहीत. आज सगळ्या अपेक्षांना न्याय देण्याचे काम करेन, सामान्य माणूस मला ओळखतो. पैसे, किंवा पदासाठी मी जात नाही. माझ्याकडे सामान्य माणसे आहेत, मोठी कोणी नाहीत. मी शब्द देतो, सत्तेचा वापर सामान्य माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी काम करेल. माझे काम काहीच स्वतःचे नाही, सत्तेचा उपयोग कसा केला जातो हेही दाखवून देऊ, मी बोलण्यापेक्षा मी घेतलेला निर्णय कामातून दाखवेन, असेही ओमराजेंनी म्हटले.

हेही वाचा

ओमराजेंचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेणार, केवळ घोषणा बाकी; भेटीसाठी तानाजी सावंत दाखल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *