नीटचा गोंधळ संपेना, विद्यार्थी नागपूरचा, परीक्षा सेंटर अबुधाबीत; एनटीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

नागपूरमधील NEET च्या परीक्षार्थीला 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी थेट अबूधाबीचं परीक्षा केंद्र देण्यात आलं होतं.  हा प्रकार समोर आल्यानंतर या विद्यार्थ्याला नागपुरात सेंटर देण्यात आलं आहे.

Re NEET Exam paper
Re NEET Exam paper

मुंबई :  नीट पेपरफुटीचा गोंधळ काही संपायचा नाव घेत नाही.पेपर फुटीमुळे फेर परीक्षा घेण्याची नामुश्की एनटीएवर आली होती. पण आता या परीक्षेतही घोळ झाल्याचं समोर आलं आहे. नागपूरमधील NEET च्या परीक्षार्थीला 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी थेट अबूधाबीचं परीक्षा केंद्र देण्यात आलं होतं.  हा प्रकार समोर आल्यानंतर या विद्यार्थ्याला नागपुरात सेंटर देण्यात आलं आहे.

अवघ्या काही तासांवर नीटची फेरपरिक्षा आली असताना नागपुरात राहणाऱ्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला चक्क युएईमधील अबुधाबीचं परीक्षा सेंटर आलं आहे. NTA कडून परदेशातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र दिलं जातं पण देशातील विद्यार्थ्याला थेट परदेशातील परीक्षा केंद्र दिल्यानं पालक आणि विद्यार्थ्याची भंबेरी उडाली. अब्दुल्लाकडे पासपोर्टही नसल्यानं परीक्षा देणार तरी कशी असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाच्या परिक्षेत झालेली ही घोडचूक समोर आल्यानंतर पीडित कुटुंबानं तातडीनं ‘एनटीए’च्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला आणि हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. तांत्रिक त्रुटीमुळे हा घोळ झाल्याचं स्पष्टीकरण एनटीएकडून देण्यात आलं आहे. अब्दुल्लाला नागपुरातच सेंटर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. अब्दुल्लाला नागपूर किंवा जवळील योग्य परीक्षा केंद्र असलेलं नवीन हॉल तिकीट जारी केलं जाईल, असं लेखी आश्वासन ‘एनटीए’कडून देण्यात आलं आहे.

= अवघ्या 24 तासांवर परीक्षा असताना परीक्षा केंद्रावरून गोंधळ घालून एनटीएनं या विद्यार्थ्याला नाहक त्रास दिल्याची टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत याप्रकरणी संताप व्यक्त केला. नागपूरचा एक मुलगा एक महिन्यापासून नीटच्या फेरपरिक्षेची तयारी करत होता. परीक्षेच्या एक दिवस आधी त्यानं हॉलतिकिट डाऊनलोड केलं असता त्याचं सेंटर आलं अबुधाबी…पासपोर्ट नाही…परदेशात जाण्याची ऐपत नाही….ना पुरेसा वेळ हाती आहे…अशा परिस्थितीत हा मुलगा रात्रभर रडत होता आणि परीक्षा देण्यासच मनाई करत होता या तणावाची कोणी कल्पना तरी करु शकतं का हे झालंच कसं ? एनटीए खरंतर देशातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहे. जी व्यवस्था एका विद्यार्थ्याला त्याच्यात शहरात एक सेंटर देऊ शकत नाही…त्या व्यवस्थेला परीक्षा घेण्याचा काहीही अधिकार नाही. आमच्या मुलांच्या भविष्यासोबत जुगार खेळणं बंद करा….

गेल्या महिन्याभरापासून देशभरात नीट पेपरफुटीचा प्रश्न ऐरणीवर आला. पेपरफुटीनं लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्यच बदलून टाकलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्या. या घोळाविरोधातचं कॉक्रोच जनता पार्टीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी लावून धरली आहे. देशात ठिकठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलनं केली जात आहेत. पण असं असतानाही एनटीएचं घोळात घोळ कायम असल्याचं चित्र आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *