मुंबई : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (एनबीटी-इंडिया) यांच्या वतीने 24 ते 29 नोव्हेंबर2026 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात, प्रवेशद्वार क्रमांक 2 जवळ मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. पुस्तके, ज्ञान आणि भारताच्या समृद्ध बहुभाषिक साहित्यिक परंपरेचा उत्सव म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
मंगळवारी दुपारच्या सत्रात मुलांसाठी कलेच्या माध्यमातून कथाकथन, चित्रकला स्पर्धा, परिचय सत्र आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ वाजल्यापासून अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
या महोत्सवात 600 हून अधिक पुस्तक स्टॉल्सवर विविध साहित्यप्रकारांतील आणि भाषांमधील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध असेल. महोत्सवादरम्यान100 हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये साहित्यिक संवाद, लेखकांशी भेट, पुस्तक प्रकाशन सोहळे, वंदे मातरम् आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील संकल्पनाधारित प्रदर्शने, बालकांसाठी विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. सर्व वयोगटांतील नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि पुस्तक संस्कृतीला बळकटी देणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
महोत्सवासंदर्भातील अधिक माहितीसाठी www.mumbaibookfestival.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित होणारा हा महोत्सव शहराच्या साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य