Albatya Galbatya: ‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Albatya Galbatya:ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ (Albatya Galbatya) हे लोकप्रिय बालनाट्य आता 1000 प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करत आहे. अद्वैत थिएटर निर्मित या नाटकाने गेल्या अनेक वर्षांपासून बालप्रेक्षकांसोबतच मोठ्यांनाही भुरळ घातली आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या नाटकातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 28 सप्टेंबर रोजी त्यांचं संगीत अनावरण करण्यात येणार आहे. (Marathi Natak)

365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल

‘अलबत्या गलबत्या’ने आपल्या प्रवासात अनेक विक्रम नोंदवले आहेत. या नाटकाने 365 दिवसांत तब्बल 333 प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम केला आहे. एवढंच नाही तर एका दिवसात चार आणि पाच प्रयोग सादर करण्यासोबतच एकाच टीमने एका दिवसात सहा प्रयोग सादर केल्याची नोंदही या नाटकाच्या नावावर आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील हा एक विशेष टप्पा मानला जात आहे.बालप्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि मराठी भाषेच्या संस्कारांना हातभार लावण्याचं कामही हे नाटक करत आहे. नाटकातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.

अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांनी दिला आवाज

चिन्मय मांडलेकर, रत्नाकर मतकरी, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि बालकलाकारांनी आवाज दिला आहे. ही गाणी आता बालप्रेक्षकांना ऐकता येणार आहेत. या गीतांचं संगीत अनावरण सोमवार, 28 सप्टेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते 10.30 या वेळेत होणाऱ्या प्रयोगानंतर हा कार्यक्रम पार पडेल. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांच्या हस्ते गीतांचं अनावरण होणार आहे. 1000 प्रयोगांच्या दिशेने सुरू असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’च्या प्रवासात गीतांचं अनावरण हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *