Government job : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कारण, दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रातील स्पर्धा वाढताना दिसत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे संघर्ष करताना दिसत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीची यशोगाता पाहणार आहोत. या व्यक्तीने तब्बल 27 वर्ष सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. अखेर 27 वर्षानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. पाहुयात सविस्तर माहिती.
उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असलेले विजय कुमार शर्मा यांना 59 व्या वर्षी सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यांचे सरकारी शिक्षक बनण्याचे स्वप्न झाले आहे. 27 वर्षांच्या संघर्षानंतर, विजय कुमार शर्मा यांची टीजीटी संस्कृत शिक्षक पदासाठी निवड झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे आयोजित एका समारंभात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. विशेष म्हणजे, विजय कुमार यांनी शिक्षक भरतीसाठी अनेक वेळा पात्रता मिळवली होती, परंतु मुलाखत प्रक्रियेत त्यांना अनेकदा नाकारण्यात आले होते. या वेळी निवड प्रक्रियेत मुलाखत नसल्यामुळे त्यांची निवड झाली.
1999 मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहिले
बागपतच्या बधवड गावातील रहिवासी असलेल्या विजय कुमार शर्मा यांची कहाणी ही संघर्ष आणि कठोर परिश्रमाचे एक उदाहरण आहे. विजय कुमार यांनी 1999 मध्ये सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले आणि जवळपास 27 वर्षांनंतर, 2026 मध्ये त्यांचे स्वप्न साकार झाले. विजय कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शिक्षक भरतीसाठी अनेक वेळा अर्ज केला आणि लेखी परीक्षेत पात्रताही मिळवली, परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावले गेले नाही.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले
भरती प्रक्रियेत मुलाखत नसल्याचा त्यांना फायदा झाला आणि त्यांची टीजीटी संस्कृत शिक्षक पदासाठी निवड झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे एका समारंभात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले, ज्यानंतर विजय कुमार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. विजय कुमार गेल्या 26 वर्षांपासून बारौतजवळील दून पब्लिक स्कूलमध्ये खाजगी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यांचे वडील, लक्ष्मण सिंग, हे देखील सरकारी शिक्षक होते.
मुलांची पोलीस दलात सेवा
विजय कुमार यांना पाच मुले आहेत. दोन मुलगे यूपी पोलिसात कार्यरत आहेत आणि तीन मुली आहेत. एका मुलीचीही शिक्षक म्हणून निवड झाली आहे, मात्र ती सध्या प्रतीक्षा यादीत आहे. विजय कुमार यांच्या यशाने शाळा आणि त्यांच्या गावात आनंदाचे वातावरण आहे. शाळेचे व्यवस्थापक प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार यांनी नोकरी करत असतानाही आपले शिक्षण कधीच सोडले नाही आणि सरकारी नोकरीची तयारी केली. विजय कुमार म्हणतात की, वय काहीही असो, जर कठोर परिश्रम आणि प्रयत्न करत राहिले तर यश निश्चित आहे. आता 59 वर्षांचे झाल्यावर त्यांच्या 27 वर्षांच्या मेहनतीचे अखेर फळ मिळाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र दिल्यानंतर खूप आनंद झाला
नोकरी मिळाल्यानंतर विजय कुमार म्हणाले, की, मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र दिल्यानंतर मला खूप आनंद झाला. मी हे माझ्या आयुष्यातील एक मोठे यश मानतो. माझी इच्छा आहे की सर्व तरुणांनी कठोर परिश्रम करून आपली ध्येये साध्य करावीत. हे साध्य करण्यासारखे आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. मी 1999 मध्ये परीक्षा द्यायला सुरुवात केली. माझ्याकडे अनेकवेळा दिलेल्या मुलाखतीची पत्रे आहेत. आता माझी निवड झाल्याने मला खूप आनंद झाल्याची माहिती त्यांनी दिली.